
कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडाकरवी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत.
या प्रकरणावर उबाठाचे आमदार सुनील प्रभु यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यावर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असे म्हणत त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहे.
अजित पवार म्हणाले, हा महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या घटनेबाबत जी माहिती दिली आहे ती तपासून घेण्यात यावी. तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल.
तसेच, या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीने प्रशासन वागेल. याची खात्री मी देतो. या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कल्याण येथील योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हे प्रकरण शिवीगाळ, मारहाणीपर्यंत गेले. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या अभिजित देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग धरून शुक्ला यांनी गुंडांना बोलवून अभिजित देशमुख यांना मारहाण केली. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.



