
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात रेशन दुकानाच्या परवानाधारकाने शासकीय धान्याची अफरातफर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळत नसून, अनेकांना हेलपाटे घालण्यास भाग पाडले जात आहे. मंगळवारी (२५ मार्च) सकाळी संतप्त नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी संबंधित दुकानदाराला घेराव घालून जाब विचारला. (Vaijapur news)
शिऊर गावातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक २३ चे परवानाधारक मधुकर सोळसे यांनी मार्च महिन्यात लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता मोठ्या प्रमाणात साठा गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला. लाभार्थी धान्य घेण्यासाठी गेले असता, सोळसे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार धान्यासाठी विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त ग्राहकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना हा प्रकार सांगितला. यानंतर काही लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन दुकानदाराला धारेवर धरले. (PDS corruption)
धान्य वाटपाबाबत विचारणा केली असता, सोळसे यांनी “मी धान्य विकून टाकले आहे, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी वाटप करीन” असे उर्मट उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तात्काळ पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण प्रकार निदर्शनास आणून दिला. काही वेळातच पुरवठा निरीक्षक (नायब तहसीलदार) प्रवीण काकडे आणि कर्मचारी दिलीप राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात धान्य गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या गैरप्रकारावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(government grain fraud)
हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही सोळसे यांनी अनेक ग्राहकांचे अंगठे घेतले आणि “पुरवठा विभागाकडून धान्य कमी आले आहे, पुढच्या महिन्यात मिळेल” असे सांगून लाभार्थ्यांना फसवले. परिणामी अनेक कुटुंबे उपासमारीला सामोरी गेली. त्यानंतर प्रकृती बिघाडाचे कारण देत त्यांनी काही दिवस दुकान बंद ठेवले. काही महिन्यांनी पुन्हा दुकान उघडले, पण त्यानंतरही धान्याची परस्पर विक्री करून गोरगरीबांची फसवणूक केली. मात्र, यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून हा गैरप्रकार बाहेर काढला. (Maharashtra ration shop scam)
पुरवठा विभागाकडून संबंधित दुकानदाराला खालील प्रमाणात धान्य वितरीत करण्यात आले होते:
अंत्योदय लाभार्थी साठा:
- ३२ किलो गहू
- ३८ किलो तांदूळ
प्राधान्य कुटुंब लाभार्थी साठा:
- १७ क्विंटल ९८ किलो गहू
- २६ क्विंटल ९७ किलो तांदूळ
गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळालेले नाही. रामदास मच्छिंद्र जाधव या लाभार्थ्याने सांगितले की, “माझे मागील महिन्याचे रेशन वगळता सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे धान्य मिळाले नाही. अनेकदा विचारणा करूनही दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देतो. शासनाने तातडीने या दुकानदाराचा परवाना रद्द करून योग्य व्यक्तीकडे दुकानाची जबाबदारी सोपवावी.” (ration shop malpractice)
हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना
पुरवठा निरीक्षक प्रवीण काकडे यांनी सांगितले की, “धान्य साठवणुकीच्या ठिकाणी पाहणी केली असता, बहुतांश धान्य गायब असल्याचे आढळून आले. तसेच, चालू महिन्यातील कोणत्याही ग्राहकाला धान्य मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असून, योग्य ती कारवाई केली जाईल.”
शासनाने याप्रकरणी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. संबंधित दुकानदाराच्या परवान्याबाबत कठोर निर्णय घेऊन गोरगरीब लाभार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (food supply corruption)
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



