पुण्याजवळील ताम्हीणी घाटामध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे. ही खासगी बस रस्त्यावरुन खाली उतरुन डोंगर कड्याच्या बाजूला पडली. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचं गांभीर्य पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताम्हीणी घाट उतरताना बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर ही बस रस्ता सोडून बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. सुदैवाने बाजूला एक मोठा खडक असल्याने बस दरीत पडली नाही. ही बस पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे जात होती. एका लग्न समारंभासाठी पुण्यातील वऱ्हाडी या बसमधून महाडच्या दिशेने प्रवास करत होते. माणगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक यंत्रणेकडून मदत कार्य सुरू आहे.

ताम्हीणी घाट हा आपल्या धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या भागात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच खराब होते, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. प्रशासनाने या अपघाताचे कारण शोधून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. ताम्हीणी घाटात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाटातील अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, आणि खराब हवामान यामुळे हा भाग प्रवाशांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here