देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. तमिळनाडू येथील कुन्नूर परिसरात त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नीसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता.

बिपीन रावत हे देशाचे सीडीएस असल्याने संरक्षण क्षेत्रातील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, त्यांच्या या अपघाता बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज अपघातानंतर व्यक्त करण्यात आला होता.

मात्र आता अपघाताच्या तीन वर्षांनी अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीने जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबतचा अहवाल संसदेत सादर केला आहे. मानवी त्रुटीमुळे अर्थात एअर क्रू मेंबरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. भारतीय वायूदलानं पुरवलेल्या माहितीच्या आधारे हा अहवालात तयार करण्यात आला आहे.

अहवालात सांगितलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने सकाळी ११:४८ वाजता सुलूर हवाई तळावरून उड्डाण केले. त्यानंतर दुपारी १२:१५ वाजता ते हेलिकॉप्टर गोल्फ कोर्सवर उतरणे अपेक्षित होते. पण, दुपारी १२:०८ वाजता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला.

या अपघातामध्ये जनरल बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका राजे सिंह रावत, त्यांचे संरक्षण सहायक ब्रिगेडियर एलएस लीडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान, हेलिकॉप्टर पायलट स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंग, सहवैमानिक ज्युनियर वॉरंट अधिकारी राणा प्रताप, जे. वॉरंट अधिकारी अरक्कल प्रदीप, हवालदार सतपाल राय, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार आणि लान्स नाईक बी साई तेजा यांचाही मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here