चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ नुसार दाखल झालेल्या धनादेश अनादरण प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. डी. एस. पिसाळ यांनी दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे आपसात नातेवाईक आहेत. फिर्यादी जलील खान अब्बास खान पठाण (५४) रा. भुईवाडा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांचे खंडाळा येथे रॉयल कृषी सेवा केंद्र व मोबाईल शॉपी नावाने व्यवसाय आहे.

आरोपी आशिक अली साहेब अली सय्यद (४०) रा. शिवूर ता. वैजापूर फिर्यादिकडून एकुण एक लाख बावीस हजार रुपयांची मोबाईल खरेदी केली. त्यापैकी फिर्यादीस एकवीस हजार रुपये रोख दिले व उर्वरीत रकमेसाठी दि. २७ डिसेंबर २०१७ चा एक लाख एक हजार रुपयांचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवुरचा धनादेश दिला.

हे वाचलं का? – छावा चित्रपटाला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी… शंभूराजे अन् येसूबाईंच्या ‘या’ सीनमुळे वाद पेटला

सदरचा धनादेश फिर्यादीने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खंडाळा येथे जमा केला परंतु अपुऱ्या निधी अभावी सदरचा धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला. फिर्यादीने आरोपीस भेटून धनादेश अनादरीत झाल्याबाबत कळविले असता आरोपीने धनादेश पुन्हा वटविण्यासाठी टाकण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादीने पुन्हा दि. २३ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा वटविण्यासाठी बँकेत जमा केला.

परंतु निधी अभावी सदरचा धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला. फिर्यादीने वकीलामार्फत आरोपीस नोटीस पाठवून अनादरित झालेल्या धनादेशाची रक्कम मुदतीत फिर्यादीस आणून देण्यास सांगितले होते. आरोपीने सदर नोटीसला उत्तर दिले त्यात त्याने मोबाईल खरेदीचा व्यवहार मान्य केला नाही तसेच फिर्यादीने धनादेश हा आरोपीच्या घरातून चोरून नेल्याचे नमूद केले.

हे वाचलं का? – घसघशीत ‘रिटर्न्स’ मोहात लाखो गुंतवले, आता पश्चात्तापाची वेळ! आयुष्यभराची जमापुंजी गेली

आरोपीचे वकील ॲड. एस. एस. ठोळे यांनी घेतलेल्या उलट तपास तसेच युक्तिवादातून मोबाईल विक्रीचा व्यवहार फिर्यादीचा मुलगा इम्रान आणि आरोपी यांच्यात झाल्याचे, आरोपीने मोबाईल विक्री कराराचा लेख इम्रानच्या नावाने करुन दिला आहे. तसेच इम्रानला प्रस्तुत धनादेश सुरक्षेपोटी दिल्याचा उल्लेख या करारनाम्यात केलेला आहे. अशा परिस्थितीत फिर्यादीला उर्वरीत रकमेपोटी धनादेश कसा दिला होता याबाबत संशय निर्माण होतो.

प्रकरण फिर्यादीने दाखल केले असून त्याच्याकडे हा धनादेश दाखल करण्यासाठी इम्रानने अधिकारपत्र किंवा त्यास योग्य प्रकारे प्राधिकृत व्यक्ती म्हणुन नेमणूक केले असल्याचे दिसून येत नाही. अयोग्य प्रकारे फिर्यादीचे सादरीकरण झालेले आहे. त्यामुळे फिर्यादी ‘योग्य धारक’ या सज्ञेमधे बसत नसल्याबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह

न्यायालयाने सदर विक्रीचा व्यवहार फिर्यादीचा मुलगा इम्रान आणि आरोपी आशिक आली यांच्यात झाला असल्याने फिर्यादीस धनादेश का दिला ? दाखल केलेल्या मोबाईल बिलांच्या सत्यताबाबत, धनादेशावरील सही आरोपीची असल्याबद्दल देखील प्राबल्यतेच्या आधारावर संशय निर्माण होत असल्याचे, फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील व्यवहार हा संशयास्पद असून योग्य नाही असे निरीक्षण नोंदविले.

प्रकरणातील फिर्याद, कायदेशिर देणे आणि चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यामुळे आवश्यक घटकांची शाबिती झाली नसल्यामुळे आरोपीने गुन्हा केला असल्याचे सिद्ध झाले नाही. त्यामुळे आरोपी आशिक आली याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. डी. एस. पिसाळ यांनी निर्दोष सुटका केली. आरोपी तर्फे ॲड. एस. एस. ठोळे आणि ॲड. आकाश ठोळे यांनी काम पाहिले.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here