
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एका महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (वय ५०) यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. श्रद्धास्थान असलेल्या कीर्तनकार महिलेवर मंदिरातच असा क्रूर हल्ला होणं, ही समाजाच्या सुरक्षिततेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
मंदिराच्या सीसीटीव्हीत आरोपी कैद
या प्रकरणात आता एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी मंदिराचा दरवाजा तोडताना स्पष्टपणे दिसत आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपींचं वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असून, ते हिंदी भाषेत एकमेकांशी संवाद करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून, आरोपींची ओळख पटवण्यासाठी सर्व साधने वापरण्यात येत आहेत.
हत्येपूर्वी मंदिरात चोरीचा प्रयत्न?
फुटेजमधून असे दिसते की, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने मंदिरात घुसले होते. मंदिराचे दार तोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच संगीताताई यांच्याशी त्यांची गाठ पडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतरच त्यांनी संगीताताईंवर हल्ला केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?
आश्रमातच झाली हत्या
संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या नियमितपणे कीर्तन सेवा आणि आध्यात्मिक उपदेश करीत असत. शनिवारी सकाळी मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले असता, त्यांना ही अमानवीय घटना आढळली. पुजार्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली असून, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचं पोलिसांचं आवाहन
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आरोपींबाबत कोणतीही माहिती, शंका अथवा तत्सम दृश्य कुठेही आढळल्यास, ती तात्काळ पोलिसांच्या अधिकृत क्रमांकांवर कॉल किंवा व्हॉट्सअॅपवर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अशाप्रकारच्या घटना इतरत्र घडल्या असल्यास, अथवा गुन्हेगारी टोळ्यांविषयी माहिती असेल, तीही तात्काळ पोलिसांना कळवावी, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर सेल आणि स्थानिक पोलीस संयुक्तरीत्या तपास करत असून, लवकरच आरोपींचा माग काढून त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


