
वैजापूर । दिपक बरकसे
हरिभक्त पारायण संगीता महाराज पवार यांच्या हत्या प्रकरणाने अजूनही गाव सुस्थितीत आलेलं नाही, तोच चिंचडगावमध्ये चोरीच्या आणखी दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे गावात खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री सदगुरू नारायणगिरी कन्या आश्रमातील मोहटा देवी मंदिरात चोरी झाली होती. याच वेळी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या हभप संगीता ताई पवार यांची हत्या झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच, रविवारी मध्यरात्री संजय सोपान तांबे आणि नवनाथ कारभारी शेलार यांच्या घरांमध्ये चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात घरात प्रवेश करून काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती आहे.
हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?
पोलिसांचा घटनास्थळी पाहणी दौरा
घटनांची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि मनोज कुलकर्णी यांनी तात्काळ सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पंचनामा केला असून चोरीची पद्धत, वेळ आणि संभाव्य आरोपींच्या हालचालींचा तपास सुरू करण्यात आला आहे. सलग दोन दिवसांत एक हत्या आणि तीन चोरीच्या घटना घडल्यामुळे चिंचडगावमधील नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिकांकडून अधिक पोलिस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे चोरीच्या घटना रात्री उशिरा आणि शांत भागात घडत असल्याने गावकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपास सुरू, आरोपींचा शोध घेतला जातोय
या सर्व घटनांची गंभीर दखल घेत वीरगाव पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे. श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि स्थानिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांतील वाढत्या चोरी आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. काहींनी रात्र गस्तीसाठी गावकऱ्यांनी संघटितपणे पावले उचलावीत, अशी सूचना दिली आहे. चिंचडगावमधील या गुन्हेगारी सत्रामुळे पोलिस यंत्रणेला आता गंभीर आव्हान मिळालं असून, लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


