
वैजापूर । दिपक बरकसे
एका आत्म्याला विविध प्रजातींमध्ये ८४ लाख जन्मांनंतर मानव जन्म मिळतो. जर त्या जन्मात त्याने चुका केल्या तर त्याला पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रातून जावे लागते. म्हणूनच आपण याच जन्मात देवाची अनुभूती घेऊया. भौतिक जगात असूनही त्यात अडकू नका, तर सतत नामजप करत राहा. विठ्ठल देवता भक्ताच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याच्या दाराशी वाट पाहत असतो, असा उपदेश हभप उद्धव महाराज कदम यांनी दिला.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे कै. बाळु यमाजी जिनराव यांच्या दशक्रिया निमित्त आयोजित किर्तनात हभप उद्धव महाराज कदम यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. या किर्तनाचे आयोजन विक्रम जानराव आणि बाबुराव जानराव यांनी आयोजित केलेल्या किर्तनात ते बोलत होते.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चार चरणांचा अतिशय सुंदर असा,
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म।
चुकलिया वर्म फेरा पडे॥
याच जन्मी ओळखी करा आत्माराम।
संसार संभ्रम भोगु नका॥
संसारी असावे असोनि नसावे।
भजन करावे वेळोवेळा॥
नामा म्हणे विठु भक्तचिये द्वारी।
घेऊनिया करि सुदर्शन॥
या अभंगावर विवेचन केले. या अभंगाच्या आधारे त्यांनी जीवनाचे सत्य स्पष्ट केले आणि मनुष्याने संसारात राहूनही भजन करावे, असे मार्गदर्शन केले. मृत्यूच्या दिवसापासून उत्तरकार्याच्या दिवसांपर्यंतच्या प्रक्रिया व महत्व याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या किर्तनात हभप संतोष महाराज गायकवाड, भजनी गायक पारसनाथ नेटके, गोरखनाथ पगार, रमेश मगर, दादाभाऊ निमगावकर, मधुकर पवार, मधुकर थोरात, पांडुरंग पवार, रामदास बडे, धोंडीराम जेजुरकर, बाबासाहेब कवार, मनोज शिंदे, राजेंद्र जानराव आदी उपस्थित होते. यावेळी शरद पगार यांनी हभप उध्वव महाराज कदम यांचा पुष्पहार अर्पण करून सन्मान केला.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



