निष्काळजीपणामुळे कोवळे जीव धोक्यात : जबाबदार कोण? वाहनचालक की पालक...

विशेष रिपोर्ट: अभिजित वाघमारे (रोड सेफ्टी एक्स्पर्ट)

भारतात दरवर्षी सुमारे २,००० लहान मुले रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. यातील अनेक अपघात सोसायटीच्या परिसरात, अपार्टमेंटसमोर किंवा पार्किंगमध्ये होतात. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

लहान मुलांचा शरीराचा आकार छोटा असल्याने, ड्रायव्हरला विशेषतः लेफ्ट साईड आणि रिव्हर्स घेताना ते दिसत नाहीत. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या चाकाखाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. काही प्रसंगी, स्वतःच्या पालकांच्या गाडीखालीच मुले चिरडली गेली आहेत. अशा घटनांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते.

अलीकडेच नाशिकमध्ये एका हॉटेलबाहेर लहान मुलगा खेळताना घसरला आणि थेट गाडीच्या चाकाखाली आला. त्याचा वडील मोबाईलवर व्यस्त असल्याने त्याला उचलायची संधीही मिळाली नाही. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले, पण तो जगू शकला नाही. ही घटना इतरांसाठी धडा ठरण्यासाठी पुरेशी आहे.

हे वाचलं का? –  रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

सोसायटीमध्ये अनेक महिला कार चालवतात, परंतु गाडीच्या डाव्या बाजूचा अंदाज घेणे त्यांना कठीण जाते. परिणामी, अनेक वेळा रस्त्यावर किंवा पार्किंगमध्ये खेळणारी मुले त्यांच्या गाडीखाली येतात. पालकांनी गाडीजवळ खेळणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.

सुरक्षेसाठी आवश्यक उपाय

  • सोसायटी आणि अपार्टमेंट परिसरात कन्वेक्स मिरर लावावे, जेणेकरून खाली कोणतेही मूल बसले आहे किंवा खेळत आहे हे सहज दिसू शकेल.
  • गाडी चालवण्यापूर्वी गाडीभोवती चक्कर मारावी आणि आजूबाजूला मुले आहेत का याची खात्री करावी.
  • रिव्हर्स घेताना विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो पार्किंगमध्ये गाडी मागे वळवताना दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी.
  • लहान मुलांना गेटच्या आत किंवा घरात असल्याची खात्री करूनच गाडी सुरू करावी.
  • मुले खेळण्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी, ज्यामुळे त्यांना रस्त्यावर किंवा गाडीच्या आसपास जाण्याची गरज भासणार नाही.
  • वाहनचालकांनी ड्रायव्हिंग करताना पूर्ण लक्ष द्यावे आणि मोबाईलचा वापर टाळावा.

हे वाचलं का? – वाहनचालकांनो सावधान! ‘ब्लाइंड मर्जर ऍक्सिडेंट’ टाळण्यासाठी ‘हे’ नियम पाळाच

अनेक आई-वडील अशा अपघातांनंतर मानसिक तणावात येतात आणि काही वेळा आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. अशा घटनांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते. अपघात टाळण्यासाठी सतर्कता आणि जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. आपल्या काही क्षणांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकते. त्यामुळे, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने जबाबदारी घेऊन योग्य खबरदारी घ्यावी.

अभिजित वाघमारे, रोड सेफ्टी एक्स्पर्ट

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here