
तुमचाही ‘बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करु’ अशी धमकी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना पत्राद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी मुळेवाडी पाटी येथे अज्ञात इसमाने तेरणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे (राहणार पुसद) याकडे खाकी रंगाचे पॅकेट दिले. या पॅकेटमध्ये पांढऱ्या कागदावर पेन्सिलने धनंजय सावंत केशव सावंत यांना ‘मस्साजोग संतोष देशमुख करू’ असा मजकूर लिहिला होता. तसेच यामध्ये एक शंभराची नोट देखील होती.
दरम्यान, या प्रकरणी संजय बाबुराव निपाणीकर (वय वर्ष ४१, राहणार निपाणी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव) यांनी ढोकी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून डोकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे अधिक तपास करत आहेत. यापूर्वी देखील धनंजय सावंत यांच्या घरावर १३ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता अज्ञाताने गोळीबार केला होता. ते प्रकरण शांत होत नाही, तोच आता पत्राद्वारे धमकी मिळाल्याने धनंजय सावंत, केशव सावंत यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय का? असा प्रश्न देखील निर्माण होताना दिसत आहे.



