"सरकारने गोमातेला मातेचा दर्जा दिला, पण… "; रामगिरी महाराजांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर व्यक्त केली खंत

वैजापूर । दीपक बरकसे

श्रीक्षेत्र सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते श्रीक्षेत्र वढू बू येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज यांनी या पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात गोमातेच्या संरक्षणाविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “राज्याने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे, पण तरीही गोहत्या थांबलेली नाही. अनेक ठिकाणी गोमांसाची विक्री होते. गोरक्षक तरुण हे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देतात, पण पोलीस प्रशासन त्यांना साथ देत नाही. उलट, या तरुणांना दोषी ठरवले जाते. हे कुठेतरी थांबायला हवे.” त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आले. (Chhatrapati Sambhaji Maharaj Award)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना महंत रामगिरी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. मी स्वतः मुख्यमंत्री असताना सरला बेट येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली होती. तिथे लाखो वारकऱ्यांचा महाकुंभ पाहण्याचा योग आला. या संतांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. महंत रामगिरी महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मयोद्धा आहेत. त्यांनी राजनिष्ठेपेक्षा आध्यात्मिक निष्ठेला नेहमी प्राधान्य दिले आणि ते असेच पुढे चालले पाहिजे.” (Cow Protection in Maharashtra)

हे वाचलं का? – “नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित, औरंगजेबाची कबर…”; महंत रामगिरी महाराज यांचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे कार्य संतांच्या उपदेशातून प्रेरित होते. “मी शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलो आहे. माझे कार्यही संतांनी दाखवलेल्या मार्गावर आधारित आहे. संतांचे विचार आणि आध्यात्मिक निष्ठा माझ्यासाठी मार्गदर्शक आहे,” असे त्यांनी नमूद केले. या पुरस्काराने रामगिरी महाराजांच्या धर्मासाठी असलेल्या लढ्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics)

या कार्यक्रमात देहू संस्थानचे ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे, तुकाराम महाराज पालखीचे प्रमुख माणिक महाराज मोरे, वारकरी आघाडीचे अक्षय भोसले, संभाजी महाराज समाधी ट्रस्टचे सोपान महाराज, गोरक्षक दलाचे मिलिंद एकबोटे, आमदार माऊली बाबा कटके, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याने संत परंपरा आणि शिवभक्तांचा संगम घडवून आणला.

महंत रामगिरी महाराज यांनी संत परंपरेनुसार समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. त्यांचा हिंदू धर्मासाठीचा लढा आणि गोसंरक्षणाची भूमिका यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी त्यांच्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते, पण त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही याप्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले. (Spiritual Leadership)

हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना

एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही संतांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, “मुख्यमंत्री असताना मी रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हाच मी सांगितले होते की, जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे, तोपर्यंत या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही.” या विधानाने त्यांनी संत परंपरेच्या रक्षणासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित केली.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here