
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे परभणीत दाखल झाले आहेत. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
सूर्यवंशी यांचा काही दिवसांपूर्वी कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले होते. यादरम्यान राज्यभरातील काँग्रेस नेते परभणीत दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला असून त्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या प्रतीची एका व्यक्तीने विटंबना केली होती. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलन केले होते. या दरम्यान जाळपोळ आणि दगडफेक घडली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा समावेश होता. मात्र, सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला होता.



