
संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड याच्यावर असलेल्या खंडणीचा आरोप याची सध्या सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय आहे. त्यामुळेच आता विरोधक हे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
याच दरम्यान आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतरच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असं विखे पाटील म्हणालेत. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का? याची चर्चा सुरू झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना याविषयी भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी १० जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.
हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?
दरम्यान, महायुतीच्या खातेवाटपात जलसंपदा खाते विभागून दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. परंतु, या चर्चांत काही तथ्य नाही याचा खुलासा पुन्हा एकदा मंत्री विखे पाटील यांनी स्वतःच केला आहे. त्यामुळे विखे पाटील मंत्रिमंडळात नाराज असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही, या खात्यात काम करण्यास भरपूर वाव आहे, नदीजोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात कामाला चांगला वाव आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मी राजीनामा द्यावा याचं काही तरी कारण लागेल ना? या कुठल्याही प्रकरणात मी ना आरोपी आहे, ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थाअर्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा बाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा. अशा पद्धतीने माझा राजीनामा काही जणं मागतायेत.
हे वाचलं का? – ना हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाखांची मागणी, उपसरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल
विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. पण अशा पद्धतीचं छोटा आका, मोठा आका ही पहिल्यांदाच भाषा मी ऐकतो आहे. कोणाचा एन्काउंटर आणि कोणाचं काय.. या अशा गोष्टी नाहीए. पोलीस प्रशासन आणि सीआयडी हे व्यवस्थितपणे तपास करत आहेत. एक लक्षात घ्या हा तपास सीआयडीकडे दिला आहे. यामुळे त्या तपासाशी कोणत्याही प्रकारचा प्रभाव हा मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही. म्हणून या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशा तीनही प्रकारच्या चौकशी सुरू आहेत. असं मुंडे म्हणाले.


