
पुण्याजवळील चाकण येथील महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण होत आहे.
या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित असतील. मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर सुद्धा केली आहे. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान ते परदेशात गेले होते. तिथून परत आल्यावर आता पवारांसोबत ते मंचावर असतील. ते यावेळी काय भावना व्यक्त करतात. काय मत मांडतात. कुणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्ष फुटीनंतर आणि गेल्या काही दिवसांमध्ये भुजबळांनी केलेली वक्तवे, बोलून दाखवलेली खदखद यामुळे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात या कार्यक्रमामध्ये काही चर्चा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कार्यक्रमात भुजबळ-पवार एकत्र येत आहेत. चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फूले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित असणार आहेत. सायंकाळी साडे चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी आमदार दिलीप वळसे पाटलांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे.


