केंद्र सरकारने शनिवारी (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी एकूण १३९ जणांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. तर, ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

दरम्यान, या १३९ दिग्गजांच्या यादीत महाराष्ट्रातील १४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व ११ दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण पुरस्कार विजेते

  • मनोहर जोशी (मरणोत्तर) – सार्वजनिक
  • पंकज उदास (मरणोत्तर) – कला
  • शेखर कपूर – कला

पद्मश्री पुरस्कार विजेते

  • अच्युत पालव – कला
  • अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
  • अशोक सराफ – कला
  • अश्विनी भिडे-देशपांडे – कला
  • चैतराम पवार – सामाजिक कार्य
  • जसपिंद नरुला – कला
  • मारुती चितमपल्ली – साहित्य आणि शिक्षण
  • राणेंद्र मजूमदार – कला
  • सुभाष शर्मा – कृषी
  • वासूदेव कामत – कला
  • विलास डांगरे – वैद्यकीय क्षेत्र

हे वाचलं का? – छावा चित्रपटाला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी… शंभूराजे अन् येसूबाईंच्या ‘या’ सीनमुळे वाद पेटला

पद्म पुरस्कारांची सुरुवात कधी झाली?

भारताचे सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये भारतरत्ननंतर पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होतो. 1954 मध्ये भारत सरकारने पद्म पुरस्कारांची सुरुवात केली. 1955 मध्ये या पुरस्कारांना अधिकृतरित्या पद्मश्री, पद्मभूषण, आणि पद्मविभूषण अशी नावे देण्यात आली.

कोणाला मिळतो पद्म सन्मान?

कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, नागरी सेवा, व्यवसाय आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ या क्षेत्रातील सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तींनाही हा सन्मान दिला जाऊ शकतो.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना काय मिळते?

पद्म पुरस्कार विजेत्यांना भारताचे राष्ट्रपती प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करतात. मात्र, या सन्मानासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. तसेच रेल्वे किंवा विमान प्रवासासाठी सवलत किंवा इतर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. पद्म पुरस्कार केवळ एक प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो.

पद्म पुरस्कार कसा मिळतो?

पद्म पुरस्कारांसाठी दरवर्षी अर्ज मागवले जातात. ज्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा व्यक्ती स्वतः अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या नावाची शिफारस संस्थांमधून, खासदार, आमदार किंवा मंत्र्यांद्वारे केली जाऊ शकते. अर्जांची तपासणी सरकारकडून नेमलेल्या समितीद्वारे केली जाते, आणि अंतिम निर्णयही समितीमार्फत घेतला जातो.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here