
महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत असून, तापमानाचा पारा झपाट्याने चढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने कहर केला असून, पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती येथे तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील अनेक भागांमध्ये ११, १२ आणि १३ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अकोला आणि चंद्रपूरमध्ये तापमान अत्यंत जास्त राहणार असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा तापमान सामान्यपेक्षा ३ ते ४ अंश अधिक राहणार असल्याने उन्हाळ्याचा तडाखा अधिक तीव्र जाणवेल.
मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येही तापमानवाढ
सोमवारी पुणे, नंदुरबार आणि मुंबईत उष्णतेची तीव्रता जाणवली. मुंबईत सांताक्रुझमध्ये तापमान ३७.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मुंबईत सलग तिसऱ्यांदा तापमान ३६ अंशांहून अधिक नोंदवले गेले असून, एप्रिल-मे महिन्यात तापमान ३८ ते ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना
नाशिकमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, तापमान ४० अंशांपर्यंत जाऊ शकते. मागील काही दिवसांपासून येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. सोमवारी ते ३६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील पाच दिवस तापमान अधिक राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गुजरातमध्ये उच्चांकी तापमान
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत गुजरातमधील राजकोट येथे देशातील सर्वाधिक ४१.१ अंश तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात अकोला, सोलापूर, ब्रह्मपुरी आणि सांगली येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे, तर जेऊर, जळगाव, परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचले.
उष्णतेपासून बचावासाठी महत्त्वाचे उपाय
- दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
- पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.
- हलके आणि सैलसर कापड परिधान करा.
- उन्हापासून बचावासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
- ताजे फळे आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करा.
राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी अधिक सतर्क राहावे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


