झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं Malhar Certificate, झटका अन् हलाल मटणात फरक काय?

महाराष्ट्रात चिकन आणि मटण विक्रीवर एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी घोषणा केली की, झटका मटण व चिकन विक्रेत्यांची नोंदणी करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या पोर्टलवर नोंदणीकृत मांस विक्रेत्यांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ (Malhar Certificate) दिले जाईल.

नितेश राणे यांनी सांगितले की, हिंदू आणि शीख ग्राहकांना त्यांच्या परंपरेनुसार झटका मांस उपलब्ध व्हावे, यासाठी मल्हार प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्रामुळे बाजारातील हलाल मांस विक्रेत्यांसमोर झटका मांसाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. मल्हार वेबसाइटनुसार, झटका पद्धतीने तयार केलेले मांस फक्त हिंदू खाटीक समुदायाच्या विक्रेत्यांकडून विकले जाईल आणि त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसेल याची खात्री केली जाईल.

मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

‘मल्हार प्रमाणपत्र’ ही एक विशेष मान्यता आहे, जी केवळ हिंदू विक्रेत्यांना दिली जाणार आहे. नोंदणीकृत दुकानांमधूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी नागरिकांना केले आहे. त्यांच्या मते, यामुळे मटणामध्ये भेसळ होणार नाही आणि हिंदू विक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या संधी उपलब्ध होईल. हिंदू तरुणांना रोजगार मिळावा आणि मांस विक्रीतील पारदर्शकता वाढावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला जात असल्याचे राणे यांनी सांगितले.

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

झटका आणि हलाल मटणातील फरक

हलाल आणि झटका ही मांस मिळवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुस्लिम समाज हलाल पद्धतीचा अवलंब करतो, तर झटका पद्धती प्रामुख्याने शीख आणि काही हिंदू समुदायात प्रचलित आहे.

हलाल पद्धत : हलाल हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘वैध’ असा होतो. या पद्धतीत प्राण्याची मान एका विशिष्ट कोनातून सावकाश कापली जाते. या प्रक्रियेदरम्यान, प्राण्याच्या श्वास नळी आणि रक्तवाहिन्या कापल्या जातात, तसेच धार्मिक मंत्रोच्चार केले जातात. प्राण्याचे संपूर्ण रक्त वाहून गेल्यावरच त्याचे मांस वापरले जाते. हलाल मटण मऊ राहते आणि जास्त काळ टिकते, असे सांगितले जाते.

झटका पद्धत : या पद्धतीत प्राण्याची मान एका झटक्यात धारदार शस्त्राने वेगळी केली जाते. या प्रक्रियेमुळे प्राणी त्वरित मृत्युमुखी पडतो. काहींच्या मते, यामुळे प्राण्याला वेदना कमी होतात. मात्र, झटका मटण आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे काहींचे मत आहे, कारण या प्रक्रियेत रक्त पूर्णतः वाहून जात नाही आणि ते मांसातच राहते. त्यामुळे मांस लवकर खराब होऊ शकते.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

दरम्यान हलाल आणि झटका या प्राण्यांना कापण्याच्या दोन पद्धती असल्या तरी त्याचा धार्मिक धृवीकरणासाठी वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे या धार्मिक धृवीकरणाच्या आगीचे चटके दोन्ही धर्मातील सर्वसामान्यांच्या ताटातल्या अन्नापर्यंत येऊन पोहचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here