Chhagan Bhujbal | Photo Credit - Facebook

नागपूर । Nagpur

अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वच पक्षातून नाराज पुढे आले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने नाराज झालेल्या भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”. असं म्हणत भुजबळांनी अजित पवार गटातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहे.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं मला सांगितलंत.

पुढे बोलताना, नव्या चेहऱ्यांनाा संधी देण्यासाठी मला डावलण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्यावर अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळालं. मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, असंही भुजबळ यांनी म्हटलंय. मंत्रिपद किती आले आणि गेले पण छगन भुजबळ काही संपणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here