
विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहिल्यानगर शहरात सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्याला भाजपा नेत्यांनीच दांडी मारल्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली आहे.
दरम्यान, भाजपच्या मेळाव्यासंदर्भात शिर्डीत प्रदेश पदाधिकार्यांसमवेत महत्वाची बैठक असल्याने भाजपचे आमदार आणि नेते कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण आयोजकांकडून देण्यात आले. सोहळ्याला दांडी मारण्याची विविध कारणे दिली असली तरी राम शिंदे यांचे झालेले पुनर्वसन भाजपाच्याच एका गटाला मान्य नाही, जिल्ह्यासह राज्यात अशी चर्चा आहे.
हे वाचलं का? – …तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरकू देणार नाही; मनोज जरांगेंचा थेट इशारा
दरम्यान या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी दहा आमदार हे महायुतीचे असून केवळ दोन आमदार महाविकास आघाडीचे आहेत पैकी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले हे आणि विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली परंतु राम शिंदे हे महायुतीचे असले तरी या सन्मान सोहळ्याला जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच आमदारांनी दांडी मारल्याने नेमकं यामागचे गौडबंगाल काय? याची चर्चा सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थितांमध्ये सुरू होती.
राम शिंदे व विखे कुटुंबामधील शीतयुद्ध हे सर्व नगर जिल्ह्याला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील उमेदवारीवरुन विखे व शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळाली. सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा एकदा विखे व शिंदे यांच्यामधील संघर्ष समोर आला. मात्र असे असले तरी शिंदे यांचा सत्कार कार्यक्रम हा कोणा एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय कार्यक्रम होता. यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थिती देणे अपेक्षित होते मात्र असे झाल्याचे दिसले नाही. तसेच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने सर्व पक्षीय सत्कार सोहळा हा कार्यक्रम सपशेल फेल गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे वाचलं का? – अपात्र बहिणींचे ‘लाड’ संपणार! ‘हे’ निकष पाळले नाहीत तर ७५०० रुपये परत घेणार
दरम्यान, राम शिंदे यांनी या कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य देखील चर्चेत आहे. आपण आता विधानपरिषदेचे सभापती झालो, त्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकत नाही किंवा पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असं अनेकांना वाटतं. पण तसा काही प्रोटोकॉल नसल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. आपल्याला सर्वकाही जमतं त्यामुळे यापुढे मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा असंच असेल असा इशारा राम शिंदे यांनी दिला. राम शिंदे यांनी हा इशारा नेमका कुणाला दिला याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.
राम शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, राज्यात ४२ मंत्री झाले आहेत. कोणाला गाडी आहे तर कोणाला सिक्युरिटी नाही, कोणाला गाडी आणि सिक्युरिटी आहे तर त्यांना ऑफिस नाही. ऑफिस आहे तर राहायला बंगला नाही. कारण राज्यात ४२ मंत्री कधीच नव्हते. मात्र मी ज्या दिवशी सभापती झालो त्यादिवशी मला ऑफिस दिलं. ‘ज्ञानेश्वरी’सारखा चांगला बंगला मिळाला. मी बंगला मागितला नव्हता. दुसऱ्यांना मात्र बंगला मागूनही मिळाला नाही.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



