"ते स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, आम्हाला.."; मंत्री विखे पाटलांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

शिर्डीत माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला जनतेनं नाकारलं. ते आता निवडणुका स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, त्याची आम्हाला काहीच चिंता नाही.” तसंच, “राज्यात जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळेल,” असा विश्वास देखील विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

हे वाचलं का? – अपात्र बहिणींचे ‘लाड’ संपणार! ‘हे’ निकष पाळले नाहीत तर ७५०० रुपये परत घेणार

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, “मी मागेच म्हणालो होतो महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही. महाविकास आघाडीचे लोक भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत. महाविकास आघाडीची सत्तेत येण्याची धडपड होती” असा टोला विखे पाटलांनी लगावला. कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच, सत्ता गेल्याबरोबर महाविकास आघाडीतील मतभेद समोर यायला सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेस उबाठाबद्दल बोलतंय उबाठा राष्ट्रवादी बद्दल चर्चा करतय, असे म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

“भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसापाई सत्ता स्थापन केली होती. निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून त्यांनी विजय संपादन केला होता. मात्र, ते नेरेटिव्ह विधानसभेला चाललं नाही”, असंही विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे घरी बसलेत, काँग्रेस पक्षाची दुरावस्था मी सांगण्याचं कारण नाही असेह विखे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडी राहील अशी स्थिती नाही असंही ते म्हणाले.

हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

संजय राऊत काय म्हणाले?

आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा स्वबळ आजमावून पाहायचं आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं. आम्ही नागपूरला सुध्दा स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी मला तसे संकेत दिले आहेत. आम्ही मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवू. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळं महापालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढणार, असं राऊत म्हणाले.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here