
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना २०२५ या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत.
देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या साईंच्या शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षानिमित्त साई मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे.
नवीन वर्षाचे स्वागत साई दरबारी करता यावे म्हणून साईभक्त शिर्डीत दाखल झाले. देश विदेशातून आलेल्या साईभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. काल मध्यरात्री बारा वाजता साईभक्तांनी एकत्र येत जल्लोष करत साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचे स्वागत केले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले.
हे वाचलं का? – नव्या वर्षात राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार!
साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साईभक्तांचा आनंद ओसंडून वाहत आहे. काल रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने मोठ्या संख्येने साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तर द्वारकामाई परिसरात भाविकांचा उत्साह देखील दिसून येत आहे.
दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळेच मंदिराच्या बाहेर एक ते दीड किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. तर चार ते पाच तास रांगेत उभे राहून दर्शनाला लागत आहे. नवीन वर्षाचे पहिले दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाले असून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटनाबरोबरच मंदिरात दर्शनाचा योग जुळून आणला आहे. त्यामुळे सर्व पर्यटन स्थळ आणि देवस्थानंवर मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळत आहे.


