
जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल ३१ डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या अन् कारचा धक्का लागल्याच्या कारणातून हा वाद उफाळला.
यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेत १२ ते १५ दुकाने जाळली आहेत. जळगावातील विविध भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून सुमारे १० जणांना ताब्यात घेतले आहे.
हे वाचलं का? – धक्कादायक! पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
काल रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंब वाहनांमधून जात होतं, वाहन चालकाने हॉर्न वाजवल्याच्या अन् कारचा धक्का लागल्याचा राग काही जणांना आला आणि त्यानंतर दोन गट आपापसात भिडले. त्यानंतर संपूर्ण घटना घडली आहे. वाहनांची आणि कारची तोडफोड करण्यात आलेली आहे. काल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस गावामध्ये दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. गावात तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. जशी जशी परिस्थिती निवळेल तशी संचारबंदीचा कालावधी केला जाणार आहे.


