
अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासात औद्योगिक विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्याचा औद्योगिक चेहरामोहरा बदलत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. केवळ शेती आणि सहकारापुरता मर्यादित न राहता, आता हा जिल्हा उद्योगांचे ‘हब’ म्हणून नावारूपास येत आहे. अहिल्यानगर आणि शिर्डी येथील औद्योगिक यशानंतर आता संगमनेर तालुक्याला प्राधान्य देण्यात येत असून, यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधींचे मोठे द्वार खुले झाले आहे. पालकमंत्र्यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून पालकमंत्री विखे पाटील यांनी सिंचनासोबतच औद्योगिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात शिर्डी येथे शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी (MIDC) उपलब्ध करून देणे हा एक मैलाचा दगड ठरला आहे. विशेष म्हणजे, शिर्डीतील या वसाहतीत केवळ छोटे उद्योगच नव्हे, तर देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीचे उत्पादनही होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून अहिल्यानगर जिल्हा भविष्यात ‘डिफेन्स क्लस्टर’ म्हणून ओळखला जावा, असे सूक्ष्म नियोजन विखे पाटील यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर संरक्षण उत्पादनात अग्रक्रमाने घेतले जाईल, यात शंका नाही.
संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून एका सुसज्ज औद्योगिक वसाहतीची मागणी प्रलंबित होती. आमदार अमोल खताळ यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीची गांभीर्याने दखल घेत, पालकमंत्री विखे पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विशेष बैठका घेतल्या. संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यावर भर दिला आहे. लवकरच संगमनेरमध्ये मोठे उद्योग दाखल होतील आणि त्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. संगमनेरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांचा हा पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
केवळ नवीन वसाहती स्थापन करणे एवढ्यावरच विखे पाटील थांबले नाहीत, तर विद्यमान उद्योजकांच्या समस्या सोडवण्याकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. अहिल्यानगर आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी, विशेषतः सुरक्षेचा प्रश्न त्यांनी प्राधान्याने हाताळला. औद्योगिक क्षेत्रात असलेले भीतीचे आणि दहशतीचे वातावरण संपवून उद्योजकांना पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून दिल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. “उद्योजक सुरक्षित तरच विकास शाश्वत” या मंत्राचा अवलंब करत त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत.
जिल्ह्याच्या या औद्योगिक भरारीला दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधांची मोठी साथ लाभत आहे. शिर्डी विमानतळाचा विस्तार आणि नवीन टर्मिनल इमारतीसाठी मंजूर झालेला निधी, तसेच जिल्ह्याच्या सीमेवरून जाणारा समृद्धी महामार्ग यामुळे मालवाहतूक आणि उद्योजकांचा प्रवास सुलभ झाला आहे. दळणवळणाची ही क्रांती जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला जागतिक बाजारपेठेची जोड देणारी ठरेल. पायाभूत सुविधांच्या या जाळ्यामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आता अहिल्यानगर जिल्ह्याकडे आकर्षित होत आहेत.
उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार व्हावे, या उद्देशाने पालकमंत्र्यांनी शिर्डी येथे टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने ‘कौशल्यवर्धिनी प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे. हे केंद्र स्थानिक युवकांसाठी संजीवनी ठरणार आहे. उद्योगांच्या गरजा ओळखून येथे दिले जाणारे प्रशिक्षण युवकांना थेट नोकरी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. अशाप्रकारे, जमीन उपलब्धता, पायाभूत सुविधा, सुरक्षित वातावरण आणि कुशल मनुष्यबळ या चतुःसूत्रीच्या आधारावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा एक नवा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ तयार केला आहे, ज्याचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


