मध्यरात्री कॉलेजामध्ये घुसला चोर, दहावी-बारावीचे मार्कशीट पळवले; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील रोटेगाव शिवारात असलेल्या एमआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट चोरीला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे पावणेबारा वाजता घडली. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MIT College theft)

या चोरीबाबत कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्याम गिरिजाराम काहाटे (वय 36, रा. आघूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ते आपल्या ड्युटीवर असताना एका स्थानिक व्यक्तीकडून माहिती मिळाली की, एक अज्ञात इसम हेल्मेट घालून कॉलेजच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला आहे. (Rotegaon marksheet theft)

ही माहिती मिळताच तक्रारदारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती पळताना दिसला. त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना कळवला. (Vaijapur police case)

हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

घटनेनंतर लगेचच कॉलेज प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने कॉलेजच्या ऑफिसमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांची दहावी व बारावीची मार्कशीट, टीसी आणि प्रवेश अर्ज असलेल्या फाइल्स लंपास केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Student marksheets stolen)

या प्रकरणी शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात इसमाविरोधात वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन अधिक तपास सुरू केला आहे. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. तसेच परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. (Helmeted thief CCTV)

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दहावी आणि बारावीच्या मार्कशीट विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असतात. प्रवेश अर्ज आणि टीसी चोरीला गेल्याने पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत. यावर तातडीने तोडगा निघावा अशी मागणी केली जात आहे. (College security breach)

हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना

या चोरीमागे कोणाचा हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यार्थ्यांची खाजगी माहिती मिळवण्यासाठी किंवा काही आर्थिक कारणांमुळे हा गुन्हा घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने नवीन उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (10th 12th documents theft)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here