शेअर मार्केटचा नाद पडला महागात! २३ लाखांना गंडवले, तिघांविरुद्ध गुन्हा

वैजापूर । दिपक बरकसे

शेअर मार्केटच्या माध्यमातुन चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवुन पुणे येथील अर्थप्लस इनव्हेस्टमेंट नावाच्या एजन्सीने जांबरगाव (ता. वैजापूर) येथील राज्य सहकारी कापुस पणन महासंघाच्या सेवानिवृत्त ग्रेडरला (कापुस प्रत निर्देशक) तब्बल २२ लाख ७३ हजार ५०० रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार वैजापुरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी निवृत्त ग्रेडर सुनिल पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर तिघांविरुद्ध वैजापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असुन या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.‌ विनोद उत्तमराव पाटील (राहणार तिरुपती नगर धुळे), सुनिल गंगाधर पाटील (राहणार चोपडा, जिल्हा जळगाव) व नवनीत हिरालाल पाटील (राहणार वडली, जिल्हा जळगाव) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

हे वाचलं का? – शेतीच्या बांधावरून वाद विकोपाला, मारहाणीत तरुणाचा जीव गेला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद उत्तम पाटील हा तक्रारदार सुनिल पाटील यांचा पुतण्या असुन सध्या तो पुणे येथे राहतो. त्याने इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण केले असुन खासगी नोकरी सोडुन तो शेअर मार्केटचे काम करतो. दुसरा आरोपी सुनिल गंगा़धर पाटील हा बीएएमएस डॉक्टर असुन विनोद पाटील याचा जिजु आहे.‌ तर तिसरा आरोपी नवनीत पाटील हा उच्च पदवीधर असुन तो विनोद पाटील याचा मावसभाऊ आहे.

या तिघांनी आपले नोकरी व्यवसाय सोडुन पुण्यातील वाकड भागात अर्थप्लस इनव्हेस्टमेंट नावाची एजन्सी सुरु केली. दरम्यान तक्रारदार सुनिल पाटील यांची मुलगी विवाहित असुन ती पुण्यात राहते. तिने २०२१ मध्ये या तिघांच्या कंपनीत काही रक्कम गुंतवली व तिला चांगला परतावा मिळाला. पाटील यांची पत्नी वंदना या एकदा मुलीस भेटण्यासाठी पुण्यात गेल्या असता मुलीने आईला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सांगितले व विनोद पाटील, सुनिल पाटील व नवनीत पाटील यांच्या ऑफिसला भेट दिली. त्यावेळी आरोपींनी दोघींना शेअर मार्केटमध्ये कसे काम चालते याबाबत सांगितले.

हे वाचलं का? – न्यायालय परिसरातून ‘मकोका’तील आरोपीचे पलायन; वैजापूरमधील घटना

त्यानंतर वंदना यांनी घरी जांबरगाव येथे आल्यानंतर पती सुनिल पाटील यांना याबाबत माहिती दिली.‌ सुनिल पाटील यांना निवृत्तीनंतर ५० लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. ही रक्कम गुंतवण्यासाठी त्यांनी पुतण्या विनोद पाटील याच्या आईवडीलांना फोनवर विचारुन माहिती घेतली. त्यामुळे सुनिल पाटील यांनी आरोपींना विचारले असता आम्ही तुम्हाला गुंतवलेल्या रकमेच्या चार टक्के मुद्दल व चार टक्के व्याज दरमहा परतफेड देऊ असे आमिष दाखवले. या आमिषाला भुलुन सुनिल पाटील यांनी सुरुवातीला ८ ऑगस्ट २०२२ मध्ये एजन्सीच्या अकाऊंटमध्ये दहा लाख रुपये पाठवले.

त्यानंतर वेगवेगळ्या तारखेत रकमा भरत ८ ऑगस्ट ते ७ फेब्रुवारी २३ या कालावधीत एकुण ४० लाख रुपये भरले. त्यातील १७ लाख २६ हजार रुपये परत मिळाले. परंतु उरलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता ज्या ठिकाणी पैसे गुंतवले तो इसम खुप मोठ्या रकमेचा अपहार करुन पळुन गेल्याचे सांगण्यात आले.‌ आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सुनिल पाटील यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरुन विनोद उत्तमराव पाटील, सुनिल गंगा़धर पाटील व नवनीत हिरालाल पाटील या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here