अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी! नागमठान पुलास जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू, महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यांना जोडणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक २१६ वरील गोदावरी नदीवरील नागमठान पुलाला जोडणाऱ्या महांकळवाडगाव शिवारातील रस्त्याच्या कामाला आज (शुक्रवार) महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प जमीन हस्तांतरणाचा प्रश्न सुटल्याने मार्गी लागला आहे. आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नाने या कामासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

प्रलंबित प्रश्नाला यश

गोदावरी नदीवरील नागमठान आणि चांदेगांव येथील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटली तरी महांकळवाडगांव बाजूकडील रस्त्याचे काम रखडले होते. जमीन हस्तांतरणाचा प्रश्न आड येत होता. मात्र, आमदार रमेश बोरनारे यांनी याबाबत तातडीने पावले उचलली. शेतकऱ्यांशी चर्चा करून जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आणि या रस्त्याच्या कामाला गती मिळाली.

महंत रामगिरी महाराजांचे मार्गदर्शन

रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले की, “या परिसरात शनिदेवगांव येथे १७८ वा सप्ताह साजरा होत आहे. हा रस्ता आणि नागमठानचा पूल सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नाने ३ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला, याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.” त्यांनी वांजरगांव बंधाऱ्याच्या कामाचाही उल्लेख केला. “वांजरगांव बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना वाहून जाणारा भराव शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान करत होता. या बंधाऱ्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करून मजबूत आरसीसी तटबंदी बांधण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?

कमालपूर बंधाऱ्याचे काँक्रिटीकरण

महंत रामगिरी महाराज यांनी कमालपूर बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचाही उल्लेख केला. “हा बंधारा पूल नसून पर्यायी मार्ग आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने या बंधाऱ्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात आले आहे,” असे त्यांनी नमूद केले. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांचे सहकार्य

नागमठान पुलाच्या रस्त्यासाठी जमीन हस्तांतरण हा महत्त्वाचा मुद्दा होता. शेतकऱ्यांनी मोबदला न मिळालेला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला जमीन अधिग्रहणासाठी सहकार्य केले. सराला बेट येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. “एकदा गेलेली जमीन परत मिळत नाही. तरीही शेतकऱ्यांनी सहकार्य दाखवले. त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळेल,” असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले. या रस्त्याचे आणि बेटावरील पुलाचे काम कॉन्ट्रॅक्टर लहामगे यांनी केले असून त्यांच्या कामाचा दर्जा उत्तम असल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी नमूद केले. “या रस्त्याचे कामही त्यांच्याकडेच आहे आणि सप्ताह सुरू होण्यापूर्वी ते पूर्ण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार रमेश बोरनारे यांचे प्रयत्न

या प्रसंगी बोलताना आमदार रमेश बोरनारे म्हणाले, “ज्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी जमीन दिली, त्यांच्यासोबत सराला बेट येथे मी स्वतः उपस्थित होतो. महंत रामगिरी महाराज यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, सप्ताहापूर्वी रस्त्याचे काम सुरू होईल आणि मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. शेतकऱ्यांनी हा शब्द पाळला आणि आज हे काम प्रत्यक्षात सुरू झाले.” त्यांनी पुढे सांगितले की, “बेटाचा भक्त म्हणून १७८ व्या सप्ताहापूर्वी सप्ताह स्थळाकडे येणारे रस्ते पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभले. महालगांव ते चेंडुफळ, नागमठान ते गाढे पिंपळगांव-मांजरी, नागमठान-माळी घोगरगांव, महालगांव-शिरसगांव-हमरापूर-अवलगांव पूल ही कामे पूर्ण झाली आहेत.”

हे वाचलं का? – कोकण कड्यावर भयंकर घडलं! ४० वर्षीय तलाठ्याने तरुणीसह आयुष्य संपवलं; चिठ्ठीत बरचं काही लिहून ठेवलं, नेमकं काय घडलं?

सप्ताहासाठी रस्त्यांची निर्मिती

आमदार बोरनारे यांनी सांगितले की, सप्ताहानिमित्त पाच रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. “शनैश्वर मंदिरापासून सप्ताह स्थळापर्यंत ४० फूट रुंदीचा भव्य रस्ता तयार होत आहे. तसेच, नवे आणि जुन्या बाजाठान ते पीरवाडी रस्त्याचे कामही सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सप्ताह स्थळाची पाहणी केली तेव्हा त्यांनी कमालपूर बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे आदेश दिले, जे आता पूर्ण झाले आहे. “श्रीरामपूर भागातून सप्ताह स्थळाकडे येणारे इतर रस्त्यांचे कामही तातडीने पूर्ण केले जाईल,” असे त्यांनी आश्वासन दिले.

जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या हस्ते विधीवत पुजन

महांकाळवाडगांव शिवारातील नितीन व प्रवीण,उत्तमराव गोडसे, मायाताई किशोर सोमवंशी, रागिणी लक्ष्मण भागवत, अनिल व सुनिल रंगनाथ खुरूद, पुरूषोत्तम आण्णा गांगुर्डे,फुलाबाई आण्णा गांगुर्डे, मुश्ताक अहमद नुर महमंद शेख, गणेश व गोकुळ प्रभाकर खुरूद,बाळू लक्ष्मण खुरूद, चांदेगांव बाजुचे धीवर या सर्व शेतकऱ्यांचे हस्ते गुरूंनी विधीवत पूजा केली.या सर्व शेतकऱ्यांचा व त्यांना एकत्रित करण्यात परिश्रम घेतलेल्या विठ्ठल सोमवंशी यांचा महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

पंचगंगा उद्योग समुहाचे प्रभाकर शिंदे यांच्याही पाठपुराव्यास मोठे यश

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अन् आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचगंगा कारखान्याचे भुमिपुजश केल्यानंतर वर्षभरात कारखाना सुरू झाला. मात्र या कारखान्यास जवळच्या अंतराचा नागमठान हा एकमेव पुर्ण झालेला पुल आहे. महाकंळवाडगांव शिवारात जमिनी हस्तांतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयापासून तर आ.रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी पाठपुरावा केला. योगायोगाने १७८ व्या सप्ताहस्थळी जाण्यासाठी जवळचा एकमेव पुल असल्याने महंत रामगिरी महाराज, आ.बोरनारे यांच्या माध्यमातून हा य़ोग जुळवून आला.

या शुभारंभ कार्यक्रमाला अहिल्यानगर भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पवार, उदयसिंह पवार, भाऊसाहेब झिंर्जुडे, डॉ. प्रकाश शेळके, राजेंद्र गलांडे, नामदेव घोगरे, राहुल दातीर, नानासाहेब वानखेडे, दत्तात्रय चोरमल, वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता रोडगे, सहायक अभियंता भारती, भानुदास विखे, रामनाथ तांबे, बद्री चव्हाण, गणेश तांबे, डॉ. गोकुळ चाहें, जगन्नाथ काळे, सुदाम कुरकुरे, प्रशांत चव्हाण, कृष्णा जोशी, योगेश वाढे, भिमाशंकर तांबे, मधु महाराज, योगेंद्रगिरी महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, किशोर थोरात, दादासाहेब तोडमल, मेघळे गुरुजी, भाऊराव भराडे, सोमनाथ भराडे, उत्तमराव बनसोडे, दिनकर बनसोडे, गंगाधर बनसोडे, दादासाहेब चौधरी, नामदेव आदिक, विठ्ठल सोमवंशी, शिवाजी बडाख, वसंतराव पवार, नंदू सोमवंशी, विठ्ठल खुरुद, कचरू महांकळे, सतीश शिंदे, हरिभाऊ बोडखे, प्रवीण पवार, मंगेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या भिमाबाई खुरुद, शेतकरी संघटनेच्या सुनिता वानखेडे यांच्यासह महांकळवाडगांव, नागमठान, चांदेगांव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले.

या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागमठान पुल आणि रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होईल आणि शेतकऱ्यांना आपला माल बाजारात नेणे सोपे होईल. या प्रकल्पामुळे वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यांमधील संपर्क वाढणार आहे. नागमठान पुलाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार रमेश बोरनारे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प मार्गी लागला आहे. सप्ताहापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here