
वैजापूर । दिपक बरकसे
महिला दिनाच्या निमित्ताने वैजापूर येथील गिताई रुग्णालयात जन्मलेल्या कन्येचा विशेष सत्कार करण्यात आला. शनिवार (ता. ८) रोजी पहाटे ५ वाजून १३ मिनिटांनी रोटेगाव येथील सौ. कविता रामनाथ शिंदे यांनी कन्यारत्नाला जन्म दिला. डॉ. चैतन्य तांबे आणि त्यांच्या पत्नी व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सौ. सुरेखा तांबे यांनी ही प्रसूती यशस्वीपणे पार पाडली.
सौ. कविता शिंदे यांचे हे पहिले बाळंतपण आणि पहिली कन्या असल्याने जायंट्स सहेली ग्रुप ऑफ वैजापूर आणि यंग सहेलीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी ग्रुपच्या प्रमुख सौ. अंजलीताई जोशी, सहेलीच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला कुलकर्णी, यंग सहेलीच्या अध्यक्षा श्रीमती भक्ती जाधव, सामाजिक कार्यकर्ते ठा. धोंडीरामसिंह राजपूत तसेच ज्येष्ठ नागरिक सौ. संध्याताई ठोंबरे, सौ. मंदाताई तांबे आणि सौ. साठे उपस्थित होते.

बाळ आणि बाळंतीणीला साडी-चोळी व बाळासाठी कपडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवजात चिमुकलीला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. सुरेखा चैतन्य तांबे, रुपाली तांबे तसेच स्त्रीच्या नातेवाईकांची उपस्थिती होती.
याच रुग्णालयात शुक्रवारी जन्मलेल्या कन्यारत्न आणि त्यांच्या मातृशक्तींचा देखील गौरव करण्यात आला. सौ. शारदा प्रशांत कटारे आणि सौ. नीलिमा संतोष राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुरेखा चैतन्य तांबे आणि सौ. मंदाताई तांबे यांचेही अभिनंदन करण्यात आले. या विशेष सत्कार सोहळ्यामुळे महिला दिनाचा आनंद द्विगुणित झाला असून, नवजात बालिकांना उत्तम भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


