
गेल्या चार महिन्यात मिळून 1.65 कोटी ग्राहकांनी जिओची सेवा वापरणे बंद केल्याचे दिसून आले आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीने एकट्या ऑक्टोबर महिन्यात 37.6 लाख ग्राहक गमावल्याची माहिती ट्रायने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे समोर आली आहे.
केवळ जिओला कंपनीलाच नव्हे तर व्होडाफोनलाही ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठा झटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात व्होडाफोनच्या 19.3 लाख ग्राहकांनी या कंपनीची सेवा वापरणे बंद केले आहे. खासगी मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दरवाढ केली होती, या दरवाढीमुळेच ग्राहकांनी या कंपन्यांकडे पाठ फिरवणे सुरू केल्याचे दिसते आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये बीएसएनएलने 5 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. गेल्या चार महिन्यांमध्ये BSNL च्या ग्राहकांची संख्या 68 लाखांनी वाढली आहे. बीएसएनएलचे ग्रामीण भागात चांगले नेटवर्क असून त्यांचे दरही इतरांपेक्षा परवडणारे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यामुळे खासगी कंपन्या चिंतेत असताना बीएसएनएलसाठी मात्र यंदाच्या वर्षाचा शेवट गोड ठरला आहे.



