
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
परदेशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन 25 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि 90 हजारांहून अधिक मते मिळवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला.
फडणवीस यांच्या उपस्थितीत आज परदेशी यांचा पक्षप्रवेश होणार असून, त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेतेही भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. विशेष म्हणजे, परदेशी यांच्या पुनरागमनासोबतच ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेना (ठाकरे गट) चे उपजिल्हा प्रमुख आणि माजी सभापती अविनाश गलांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष मांजाहरी गाढे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
परदेशी यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच भाजपमध्ये पुनरागमन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण महाविकास आघाडीच भाजपच्या गोटात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वैजापूरच्या राजकारणाला नवीन दिशा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


