जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात! आगीच्या अफवेनं घेतला अनेकांचा बळी… नेमकं काय घडलं?

जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या परधोड रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या आगीच्या भितीने काही प्रवाशांनी उड्या मारल्या, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. यामध्ये मोठी जिवीतहानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून सहा ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे तिथे आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. आग लागल्याच्या भीतीनं प्रवासी घाबरले. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. उड्या मारणारे प्रवासी बंगळरु एक्स्प्रेसच्या खाली चिरडले गेले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोक जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत.

हे वाचलं का? – स्की रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! किमान ६६ जणांचा होरपळून अंत, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या

ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. त्यामध्ये सर्व रुग्णांना मदत केली जात आहे असेही प्रसाद म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार, ६ ते ८ चा आकडा सांगितला जात आहे. अजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. सध्या आपली प्राथमिकता जखमींना उपचार देण्याची आहे, असेही आयुष प्रसाद म्हणाले.

या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे की, “जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.”

हे वाचलं का? – नाशिक हादरलं! अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here