महाराष्ट्र हादरला! संतोष देशमुखांना टॉर्चर करताना अमानुषपणाचा कळस गाठला, हत्येवेळीचे क्रूर फोटो समोर

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. हत्येच्या तीन महिन्यांनंतरही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. आता या हत्येच्या क्षणांचे अंगावर शहारे आणणारे फोटो समोर आले आहेत.

सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये या फोटोंचा समावेश असून, हत्या करतानाच व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, आरोपींनी ‘मोकारपंथी’ नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. हे सर्व पुरावे आता सीआयडीच्या ताब्यात आहेत.

फोटोंमध्ये हत्येच्या अमानुष कृत्यांचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. कोणी दांडक्याने मारताना तर कोणी मानेवर पाय ठेवताना दिसत आहे. अत्याचार होत असताना आरोपींमध्ये काही जण हसत असल्याचेही आढळले आहे.

संतोष देशमुख यांचा सुजलेला चेहरा, जमिनीवर गतप्राण पडलेले शरीर आणि त्यांच्यावर सुरू असलेला अत्याचार हे फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे निष्पन्न झाले आहे. चार्जशीटनुसार, खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या ही प्रकरणे एकाच कारणातून घडल्याचा आरोप आहे. कट रचल्याचे ठिकाण आणि इतर महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत.

या हत्येच्या कटात आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, तसेच सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि अद्याप फरार असलेला कृष्णा आंधळे यांचा समावेश आहे.नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांनंतर कराडविरुद्ध ठोस पुरावे मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील अद्याप फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here