
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने आज (२२ जानेवारी) वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मिक कराड याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) हजर केले गेले. त्या अगोदर वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली गेली. वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने गोळ्या औषधे दिली, अशी माहिती डॉक्टर अमोल जोगदंड यांनी दिली.
हे वाचलं का? – १ रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार, योजना खरंच बंद होणार?; काय म्हणाले राज्याचे कृषीमंत्री?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. खुनाच्या कटात संशयित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाल्मिक कराडची कोठडी मागितलेली नाही.
दरम्यान, न्यायलयीन कोठडी मिळाल्यानवर आरोपीली जामीनासाठी अर्ज केला जातो. त्यामुळे कराडकडून जामीनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. मात्र मकोकाचा लागला असल्याने त्याला जामीन मिळणं कठीण आहे. मागील सुनावणीवेळी कराडने कोठडी मागितली होती. देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे आता कराडलाही न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज पार पडलेल्या सुनावणीवेळी सीआयडीकडून आणखी वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली नाही. वाल्मिक कराड याचा बुधवारी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये वाल्मिक कराड हा खंडणी मागितली त्या दिवशी विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये जता आहे. यावेळी कराडसोबत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, प्रतिक घुले दिसत आहे. त्यासोबतच पोलीस निरीक्षक राजेश पाटीलसुद्धा उपस्थित होते.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा
दरम्यान, वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली? न्यायलयाच्या या निर्णयामुळे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.


