
अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील आठवड्यात म्हणजे ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत लखनऊ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे.
सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी १९९२ मध्ये, जेव्हा ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली.
कोण होते सत्येंद्र कुमार दास?
१९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती. यानंतर, १९७६ मध्ये, त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर ७९९२ मध्ये जेव्हा त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत होता. २०१८ पर्यंत सत्येंद्र दास यांचा पगार फक्त १२ हजार रुपये दरमहा होता.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



