
महाराष्ट्र सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया भरुन सहभागी होता येत होते. मात्र राज्यातील काही भागांमध्ये या योजनेत गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहे.
यानंतर कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक रुपयात पीक विमा योजनेत बदल करुन शेतकऱ्याने भरावयाची रक्कम १००रुपये करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती आहे. या संदर्भात दैनिक लोकसत्ताने वृत्त दिलं आहे. यामुळे एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहे. अशातच आता राज्याचे कृषी मंत्री यांनी या संदर्भात मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले कृषी मंत्री कोकाटे?
एक रुपयात पीक विमा या योजनेत घोटाळा झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले की, “बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या अर्जावर कारवाई करण्यात आलेली आहे. ४० रुपये मानधन हे सीएससी केंद्रचालक अर्ज भरण्यासाठी घेत असतात. त्यांना ४० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे बोगस अर्ज भरून जास्त पैसे मिळवण्यासाठी हे प्रकार करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी समितीने आम्हाला अहवाल पाठवला आहे. त्या संदर्भात आम्ही विचार करू आणि योजना बंद न करता त्यात अपडेट करू. कुठल्याही योजनेमध्ये २ ते ५ टक्के गैरव्यवहार हे होत असतात. पीक विमा योजनेचे आतापर्यंत ४ लाख अर्ज बाद करण्यात आले आहेत”.
हे वाचलं का? – कांदा उत्पादकांवर नवे संकट! बांगलादेशकडून आयातीवर दहा टक्के शुल्क
कृषीमंत्री म्हणाले की, बोगस सातबारा उतारे, ऑनलाईन योजनेमुळे राज्याबाहेरील शेतकऱ्यांनीही या योजनेत अर्ज दाखल केले. राज्यातील ५-६ जिल्ह्यात मशिदी, मंदिर, शासकीय जमीन, बिगर कृषी जमीन यावरही पीक विमा उतरवल्याचे निदर्शनास आले आहे. ९६ केंद्रावर कारवाई केली आहे. या खात्यांवर आम्ही पैसे वर्ग न केल्याने शासनाचे पैसे वाचले आहेत. पीकविमा योजनेत आणखी काही बदल करायचे असतील तर अधिकाऱ्यांना फिडबॅक घ्यायला सांगितले आहे. शेतकऱ्यांना यूनिक आयडी, आधार कार्ड आणि सॅटेलाईटसोबत टायअप करून पीकविमा देण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात बोगस पिक विम्याचा बोगस पॅटर्न गाजत असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यामुळे हा घोटाळा बीड मध्ये झाल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता केवळ बीड मध्येच गैरव्यव्हार नाही. मंत्र्यांनी हे गैरव्यवहार केले असे नाही. धनंजय मुंडेंवर होणारे आरोप राजकीय असल्याचे ते म्हणाले. अनेक अर्ज रद्द केले, त्या खात्यात पैसे वर्ग केलेले नाही. शासनाचा पैसा वाचवल्याचे ते म्हणाले.
एक रुपयात पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि बोगस अर्ज भरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ही योजना वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे पीकविमा योजना बंद करण्यात यावी अशी शिफारस कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारकडे केली आहे. मात्र आता कृषी मंत्री कोकाटे यांनी योजना बंद करणार नसल्याची माहिती दिली आहे.
हे वाचलं का? – शेतकरी कापूस, सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार?
गैरप्रकार असेल तिथं कडक कारवाई करा -सुधीर मुनगंटीवार
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक रुपयाच्या पीक विमा योजनेनं बोगस पीक विमा येतो असं म्हणनं बरोबर नाही, अशी भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा १५५१ कोटी रुपयांचा विमा आपण भरतो. कोणतीही कंपनी 80 टक्के पर्यंत नुकसान भरपाई देत असेल तर आपला हिस्सा कमी होतो. १०-१२० टक्क्यांनंतर सारेच पैसे आपण देतो, अर्धा अर्धा हिस्सा आपण देतो. शेतकऱ्यांना आज मिशन जय किसानची आवश्यकता आहे. या क्षेत्राकडे गंभीरपणे लक्ष देणं आवश्यक आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
शेतकऱ्याच्या मुलांनी शेती करणे सोडून दिले तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागते त्यापेक्षा दहा हजार पट अन्नधान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सोनं इम्पोर्ट करणे आवश्यक नाही मात्र अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे आपण नापास झालो, असा अर्थ होईल. आपल्याला १९५६-५७ मध्ये धान्य आयात करावं लागलं. अन्नधान्य निर्यातदारांच्या यादीत पहिल्या १० जणांच्या यादीत नाव नाही. मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे. ते करताना कोणताही निर्णय घाई घाईनं, धरसोडीच्या वृत्तीनं करु नये, असं मुनगंटीवार म्हणाले.
हे वाचलं का? – यंदा ऊस, गहू व कांद्याची विक्रमी लागवड!
जिल्हे आणि बोगस अर्जदार संख्या
- बीड – १ लाख ९ हजार २६४
- सातारा – ५३ हजार १३७
- जळगाव – ३३ हजार ७८६
- परभणी – २१ हजार ३१५
- सांगली – १७ हजार २१७
- अहिल्यानगर – १६ हजार ८६४
- चंद्रपूर – १५ हजार ५५५
- पुणे – १३ हजार ७००
- छत्रपती संभाजीनगर – १३ हजार ५२४
- नाशिक – १२ हजार ५१५
- जालना – ११ हजार २३९
- नंदुरबार – १० हजार ४०८
- बुलढाणा – १० हजार २६९
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


