शाळेच्या आवारात अचानक बसनं घेतला पेट, वैजापूर तालुक्यातील घटना, सुदैवानं जीवितहानी नाही

एका खासगी शाळेची स्कूल बस पेटल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे घडली आहे. सुदैवाने ही दुर्घटना बस शाळेच्या आवारात असताना घडली. जर ही बस मुलांना घेऊन जात असताना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथे होली एंजल इंग्लिश स्कूलच्या परिसरात आज (मंगळवार) सकाळी १० वाजता स्कूलबसला अचानक आग लागली. स्कूल बस शाळेच्या परिसरात उभी असताना अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही वेळातच आग भडकली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखून पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

आग लागल्याच्या वेळी सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे पालक वर्गात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलं का? –  धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार पत्रकारावर प्रचंड भडकले!

अचानक होणाऱ्या अशा घटनांमुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. अशावेळी शाळा प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते, त्यांचे चेकअप वेळच्या वेळी केले जावे. निर्धारित वेळेत या वाहनांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्यात यावी. कारण एखाद्या वायरच्या स्पार्किंगमुळेही पूर्ण गाडीला आग लागू शकते. या घटनेतही असाच प्रकार घडला आहे. प्रयत्न केल्यास, दक्षता बाळगली तर असे अपघात नक्कीच थांबवू शकतो. हे पाहता शाळा प्रशासनाने खबरदारी बाळगावी, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here