चार मजुरांचा झोपेतच करुण अंत

वैजापूर । दिपक बरकसे

छत्रपती संभाजीनगर-मालेगाव महामार्गावरील टूनकी शिवारातील बळीराजा ढाब्याजवळ अवजड लोखंडी प्लेट वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्लेटा सरकून त्याखाली दबून याच गाडीत मागे झोपलेल्या मध्यप्रदेश येथील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.२७ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेबाबत शिऊर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाज (खाट) विकणारे पाच परप्रांतीय मजूर हे कर्नाटक येथून मध्यप्रदेश कडे जाण्यासाठी अवजड लोखंडी प्लेटची वाहतूक करण्याऱ्या ट्रक (क्र.आर.जे ०९ जी.डी ३८५३) ने जात होते.त्यांनी आपल्या पाच दुचाकी ह्या ट्रॉलीमध्ये ठेवल्या व पाचपैकी चार मजूर रात्रीच्या वेळी झोप येत आसल्याने ट्रकच्या ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते.

छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गाने जात असताना चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्या ट्रक मधील लोखंडी प्लेट सरकल्याने मोठा आवाज झाल्याने चालकाने केबिन मध्ये बसलेल्या अनिल पप्पुजी गरसिया याला मागे जाऊन बघण्यासाठी संगीले तेव्हा प्लेट सरकल्याचे लक्षात आले.अपघातानंतर चालकाने ट्रक ही जवळच असलेल्या वैजापूर तालुक्यातील टूनकी येथील बळीराजा हॉटेल जवळ उभी केली. त्यावेळी कॅबिनमध्ये बसलेल्या अनिल पप्पूजी गरासिया याने झोपलेल्या सहकाऱ्यांना बघीतले असता त्यांच्या अंगावर लोखंडी प्लेट दबले असल्याचे दिसले.

हे वाचलं का? – न्यायालय परिसरातून ‘मकोका’तील आरोपीचे पलायन; वैजापूरमधील घटना

त्यावेळी तो हॉटेल चालकाला पोलिसांना फोन करण्यासाठी सांगितले. हॉटेल चालकाने डायल ११२ वर फोन करत याबाबत पोलिसांना माहिती दिली. तर याच वेळेत चालक हा दुसऱ्या गाडीत बसून पसार झाला.घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, गणेश गोरक्ष, सुभाष ठोके, यांनी घटनास्थळी जाऊन मृतांना पोकलेनच्या साहाय्यने पहाटेच्या सुमारास बाहेर काढले व शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी

दिवाण मानसिंग गरासिया (वय २४), विजय कंवरलाल गरासिया (वय २१), निर्मल राजुजी गरासिया (वय २१), विक्रम मदनजी कछावा (वय २१) (सर्व राहणार खडावदा, ता. मनात, जिल्हा नीमच, मध्यप्रदेश) यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात ट्रक चालक सुरेश गुर्जर रा.भिलवाडा राजस्थान याच्या विरोधात शिऊर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैभव रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली विजय भिल्ल पुढील तपास करत आहेत.

देव तारी त्याला कोण मारी..?

या उक्तीप्रमाणे पाच नातेवाईकांसह ट्रक मध्ये पाठीमागे झोपण्यासाठी गेले असतांना गाडी चालकाने एकास स्व:तहा एकाला विनंती केली की, रात्रीचा प्रवास आहे. त्यामुळे माझ्या एक जण कॅबिनमध्ये थांबा आणि झोप आल्यास जागा आहे तुम्ही झोपू पण शकता. त्यामुळे पाच पैकी एक मजूर वाचला चालक फरार झाला. मात्र ठाण्यात सर्व हकिकत सांगताना अनिल गरासिया यांनी हबंरडा फोडला.

पोटाची खळगी अन् जीवाशी खेळ…

पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतात बाज विकण्याचा व्यवसाय करून कुटूंबाला भेटण्यासाठी जात आसतांना काळाने घाला घालून जिवाशी खेळ झाल्याची खंत मध्यप्रदेश येथील मृतदेह घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

मात्र, चालकाने अचानक ब्रेक दाबताच ट्रॉलीतील लोखंडी प्लेट पुढे सरकली आणि झोपलेल्या मजुरांवर कोसळली. या अपघातात दिवाण मानसिंग, विजय कंवरलाल, निर्मल गरासिया, आणि विक्रम कछावा यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची वये केवळ २० ते २४ दरम्यान होती.

घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब व उपनिरीक्षक ओगले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोकलेच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिऊर पोलीस ठाण्यात सुरू असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here