Vaijapur News: वैजापूर नगरपालिकेतील ‘नोकर’ झाले ‘राजे’! गलथान कारभाराने शहराची दुरवस्था, नागरिकांना फक्त शब्दांचे खेळ

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर नगरपालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असताना याकडे पुढाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ आहे ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना. समस्या घेऊन आलेल्या अभ्यागतांच्या समस्या ऐकून न घेताच ‘शब्दबंबाळ’ करून पिटाळून लावले जाते.

कार्यालयप्रमुखांसह बहुतांश कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी राहून ‘उंटावरून शेळ्या राखण्यासारखा’ पालिकेचा कारभार पाहतात. एकंदरीतच पालिकेत सध्या ‘हम करे सो कायदा’ सुरू असून नोकरीला आले अन् पालिकेचे ‘मालक’ झाले. अशी अवस्था झाली आहे.

साधारणतः दोन वर्षांपूर्वी पालिका सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्रे हाती आली. परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांची बदली झाली अन् कारभार दुसऱ्या अधिकाऱ्याचा हाती गेला. तेव्हापासून शहराला ‘अवकळा’ लागली आहे. खुल्या गटारींसह भूमिगत गटारी ओसंडून वाहू लागल्या आहेत. स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब सुरू झाली आहे. अशुद्ध पाणीपुरवठा, शहराच्या चोहोबाजूंनी साचलेले कचऱ्यांचे ढीग, शहरात डासांनी मांडलेला उच्छाद, अधिकाऱ्यांची मनमानी हे आता कायमचेच झाले आहे.

हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना

बाहेरून शहरात येणाऱ्यांचे स्वागत कचऱ्यांच्या ढीगाने होते. यापेक्षा बकाल अवस्था शहराची काय असू शकते? कार्यालयप्रमुख येवल्यातून अपडाऊन करतात. दुपारी १२.३० वाजता कार्यालयात यायचं. दोन वाजेपर्यंत थांबायचे अन् पुन्हा पाच वाजता पालिकेत ‘आराम’ करून यायचे. तोपर्यंत समस्या घेऊन आलेल्या अभ्यागतांची कंटाळून – कंटाळून ‘वाट’ लागलेली असते. अभ्यागतांना अधिकाऱ्याची एवढी प्रतीक्षा करावी लागत असेल तर ते कशाला थांबतील. प्रतीक्षा करूनही त्यांची समस्या तर सुटत तर नाहीच. त्याबदल्यात त्यांना अधिकाऱ्यांकडून तुसटपणाची वागणूक मिळून ‘शब्दबंबाळ’ होण्याची वेळ येते.

अभ्यागतांची भेट घेणे हे अगोदर अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. समस्या, प्रश्न जाणून घेणे हा नंतरचा भाग आहे. परंतु अभ्यागतांना पहिला प्रश्न पडतो की, भेटायचे कुणाला व कुठे? कारण अधिकारी ‘ठिकाणा’वर नसतात. कार्यालयप्रमुखांप्रमाणेच त्यांच्या खालोखाल असणारे उपमुख्याधिकारीही छत्रपती संभाजीनगर येथे राहून कारभार पाहतात. त्यांच्याही असंख्य तक्रारी आहेत. कार्यालयप्रमुखांसह अन्य अधिकारीही आठवड्यातून कधीतरी हजेरी लावतात. त्यातही त्यांचा डामडौल, मग्रुरी, आडदांडपणा पाहता विचारता सोय नाही.

शासनाकडून गलेलठ्ठ पगार घ्यायचा अन् कामे न करता अभ्यागतांना ‘सुनावून’ घ्यायचे. असंच सध्या सुरू आहे. पालिकेत सध्या समस्यांना प्राधान्य तर नाहीच. परंतु अभ्यागतांना मोठ्या युक्तिवादाला सामोरे जावे लागते. न्यायालयात एखाद्या खटल्यावर जेवढा युक्तिवाद होत नसेल तेवढा येथे होतो. अधिकारी समस्या सोडवण्याऐवजी प्रश्नांमध्ये गुरफटून अभ्यागतांना पिटाळून लावतात.

हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

त्यामुळे येणारा हेही विसरून जातो की, आपण कशासाठी आलो होतो? अधिकारी पालिकेचे मालक नव्हें तर जनतेचे नोकर असतात. याचे धडेही आता पालिकेतील अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत सध्या जिकडे-तिकडे चोहीकडे आनंदी- आनंद गडे’ असेच म्हणता येईल. हा कारभार सुधारेल. तो सुदिन उगवला म्हणायचा!

अवघड दुखणं अन् जावई डाॅक्टर!

पालिकेतर्गंत काम करणाऱ्या ठेकेदारांची अवस्था म्हणजे ‘अवघड जागी जखम अन्‌ जावई डॉक्टर’ अशी झाली आहे. अधिकाऱ्यांनी अचानक ‘टक्केवारी’ वाढविल्याने हे दुखणं सांगायचे कुणाला? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे ठेकेदार आता काढता पाय घेऊ लागले आहे. काम नाही मिळाले तरी चालेल पण अधिकाऱ्यांचे ‘घर’ भरायचे नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सध्या शहरात ठेकेदारांच्या मुस्कटदाबीची खुलेआमपणे चर्चा सुरू आहे. कोण किती टक्केवारी मागतो. हे आता झाकून राहिले नाही. एकंदरीत नोकरदारच पालिका लुटून खायला निघाले असल्याचे समोर येत आहे.

..तरच होईल भांडाफोड

वैजापूर पालिकेवर गलथान कारभाराचा ठपका ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी आडदांड अधिकाऱ्याला नोटीस बजावली खरी! परंतु केवळ नोटीस देऊन हा गलथान कारभार थांबणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी न. प. कार्यालयाची झाडाझडती घेऊन तेथे काय चालू आहे. याची शहानिशा केली पाहिजे. त्यानंतरच अधिकाऱ्यांच्या प्रतापाचा भांडाफोड होईल.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here