
तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल गेमिंगचे व्यसन तरुण पिढीसाठी किती घातक ठरू शकते, याचा एक अत्यंत सुन्न करणारा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये समोर आला आहे. येथील ‘भारत सिटी सोसायटी’मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. प्राथमिक तपासात या तिन्ही मुली एका ‘कोरियन लव्हर गेम’च्या आहारी गेल्या होत्या आणि गेममधील शेवटचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले असून, पालकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १६ वर्षांची निशिका, १४ वर्षांची प्राची आणि १२ वर्षांची पाखी या तीन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. या तिन्ही मुली त्यांचे वडील चेतन कुमार आणि आईसोबत भारत सिटी सोसायटीत राहत होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साधारण २:१५ ते २:३० वाजण्याच्या सुमारास, जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत होते, तेव्हा या तिन्ही बहिणींनी मिळून इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून खाली झोकून दिले. प्रचंड आवाज झाल्याने सोसायटीतील सुरक्षारक्षक आणि नागरिक घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा असा अंत पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणि मुलींच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या आत्महत्येमागे ‘कोरियन लव्हर गेम’ (Korean Lover Game) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, या गेमची ‘कमांडर’ मधली बहीण प्राची होती. अवघ्या १४ वर्षांची प्राची या ऑनलाइन गेमला लीड करत होती आणि बाकी दोन बहिणी तिच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करत होत्या. निशिका, प्राची आणि पाखी या तिघींमध्ये इतके घट्ट नाते होते की, त्या आंघोळ, जेवण, झोपण्यापासून ते शाळेत जाण्यापर्यंतची सर्व कामे एकत्रच करायच्या. दुर्दैवाने, मृत्यूच्या दारात उडी घेतानाही त्या एकमेकींच्या सोबतीनेच गेल्या.
मुलींचे वडील चेतन कुमार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले की, त्यांच्या तिन्ही मुलींना गेल्या काही काळापासून या कोरियन गेमचे गंभीर व्यसन जडले होते. अनेकदा त्यांना समजावण्याचा, मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, व्यसन इतके टोकाचे होते की, त्या लपूनछपून हा गेम खेळत असत. घटनेच्या दिवशी या जीवघेण्या गेमचा ५० वा आणि शेवटचा टास्क होता. हा टास्क नेमका काय होता, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, तो पूर्ण करण्यासाठीच या तिघींनी ९ व्या मजल्यावरून उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
‘कोरियन लव्हर गेम’ म्हणजे नेमके काय, हे समजून घेणे आता महत्त्वाचे ठरले आहे. हा प्रामुख्याने एक ‘रोमँटिक सिम्युलेशन गेम’ असतो, ज्यामध्ये खेळाडू कोरियन संस्कृतीतील पात्रांशी संवाद साधतात. यात संवादाचे विविध पर्याय दिले जातात, ज्यातून निवडून खेळाडू मैत्री किंवा प्रेमाची दिशा ठरवतात. के-ड्रामा आणि के-पॉपच्या वाढत्या क्रेझमुळे किशोरवयीन मुलांमध्ये हे गेम अत्यंत लोकप्रिय आहेत. प्ले स्टोअरवर ‘Mystic Messenger’, ‘Love Alarm’ किंवा ‘K-Pop Dating Game’ यांसारखे अनेक गेम्स लाखो वेळा डाउनलोड केले गेले आहेत. वरवर साधे वाटणारे हे गेम्स कधी मानसिक गुलामगिरीकडे नेतात, हे खेळाडूच्या लक्षातही येत नाही.
या प्रकरणाचा तांत्रिक तपास करणाऱ्या पोलीस पथकाने मुलींचे मोबाईल फोन जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. ज्या लिंकवरून मुलींना या धोकादायक टास्कसाठी प्रवृत्त करण्यात आले, त्या लिंकचा आणि गेमच्या सर्व्हरचा शोध घेतला जात आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, अनेकदा अशा गेम्समध्ये युजर्सना भावनिक साखळीत अडकवून त्यांना धोकादायक पावले उचलण्यास प्रवृत्त केले जाते. ५० व्या टास्कच्या नावाखाली या मुलींना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले का? याचा तपास आता गाझियाबाद पोलीस करत आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या ऑनलाईन वावराचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मुले तासन् तास मोबाईलमध्ये काय पाहतात, कोणते गेम्स खेळतात आणि त्यांच्या वागण्यात काय बदल होत आहेत, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. ही केवळ एक आत्महत्या नसून डिजिटल युगातील एक मोठा इशारा आहे. गाझियाबादमधील ही घटना ऐकून संपूर्ण देश सुन्न झाला असून, इंटरनेटवरील अशा जीवघेण्या गेम्सवर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



