Stray Animals | Representative Image

सिन्नर । Sinner

शहर व परिसरात मोकट जनावरांचा सुळसुळाट झाला असून वाहतूक कोंडीसह अपघातांना निमंत्रण देणाऱ्या मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील सुजाण नागरिकांकडून होत आहे.

सिन्नर शहरातील वावी वेस, बाजार समिती, तहसील कार्यालयाच्या समोर मोकाट जनावरे मोठ्या संख्येने फिरत असतात. वावी वेशीच्या बाहेर तर शिर्डी-निफाड रस्त्याच्या कोपऱ्यावर मोकाट जनावर नेहमीच ठाण मांडून असतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीला नेहमीच निमंत्रण मिळत असते.

कितीही हॉर्न वाजवला तरीही जनावरे रस्त्यावरून उठण्यास तयार होत नसल्याने वाहन चालकांना राँग साईडने आपली वाहने काढावी लागतात. त्यातून परिसरात छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. बाजार समितीसमोरच्या रस्त्यावर तर ही जनावरे अनेकदा बेफाम होऊन पळत फिरतात. ही जनावरे घोळक्याने फिरत असल्याने रस्त्याने पायी चालणेही अवघड बनते. दुचाकीसह चारचाकी वाहनांनाही या जनावरांना धक्का लागू नये यासाठी कसरत करावी लागते.

तहसील कार्यालयाचा कोपरा हा देखील या मोकाट जनावरांचा आवडता अड्डा असून या रस्त्यावरही ही जनावरे दिवस दिवस ठिय्या देत असतात. त्यातून सिन्नर शहरात जाणाऱ्या व बारागाव पिंप्रीकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो अशीच अवस्था बसस्थानक परिसरासह सरदवाडी रस्त्याकडील उपनगरांची आहे. अनेकदा या मोकाट जनावरांमध्येच तुंबळ हाणामारी होते आणि रस्त्याने जाणाऱ्या सर्वसामान्यांना आपला जीव वाचवत पळावे लागते.

ही मोकाट जनावरे सर्वसामान्य सिन्नरकरांसाठी जीव घेणे ठरु लागली असून नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मोकाट जनावरांची संख्या वाढल्यानंतर यापूर्वी नगर परिषदेने पुढाकार घेऊन ही मोकाट जनावरे पकडून पेठ-सुरगाणा भागातील जंगलात यापूर्वी सोडले होते. त्यावेळी काही महिने मोकाट जनावरांच्या त्रासातून सिन्नरकरांची सुटका झाली होती.

मात्र, ही सुटका औट घटकेची ठरली होती. काही महिन्यातच या जनावरांची संख्या पुन्हा वाढली आणि दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढच होत आहे. एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वीच नगर परिषदेने पुढाकार घ्यावा आणि ही मोकाट जनावरे पकडून पांजरपोळ अथवा इतर गो-शाळेमध्ये पोहोचवावीत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here