
सोशल मीडियाच्या झगमगाटात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे ‘इन्फ्लुएन्सर्स’ सध्या कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. सापांना जीवनदान देणारा सर्पमित्र, समाजसेवक आणि ५६ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेला सुप्रसिद्ध युट्यूबर आकाश जाधव आता चक्क गांजा तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे.
छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत आकाश जाधवला अटक करण्यात आली असून, त्याच्या या ‘काळ्या कारनाम्यांमुळे’ सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. जे हात सापांना पकडून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ओळखले जात होते, त्याच हातांनी कोट्यवधींच्या गांजाची तस्करी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे छत्तीसगडपासून महाराष्ट्रापर्यंत पसरलेली आहेत. ७ जानेवारी रोजी छत्तीसगड पोलिसांनी एका संशयास्पद रुग्णवाहिकेची झडती घेतली असता, पोलिसांचे डोळे विस्फारले. आजारी रुग्णांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या जीवनरक्षक वाहनाचा वापर चक्क अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी केला जात होता.
या रुग्णवाहिकेतून पोलिसांनी तब्बल ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त केला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २ कोटी ६० लाख रुपयांच्या घरात आहे. सुरुवातीला पोलिसांनी या वाहनातील तीन तस्करांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण रॅकेटचा ‘किंगपिन’ महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरदेवळे येथील आकाश जाधव असल्याचे समोर आले. यामुळे पोलीस दलासह सर्वसामान्य जनतेतही एकच खळबळ उडाली आहे.
आकाश जाधव हा केवळ एक सर्पमित्र नसून तो एक मोठा ‘सोशल मीडिया स्टार’ आहे. युट्युबवर ५६ लाख आणि इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेला हा तरुण आपली ही लोकप्रियतेची प्रतिमा तस्करीसाठी ढाल म्हणून वापरत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाची खेप मागवून ती महाराष्ट्रात, विशेषतः पुणे आणि अहमदनगर परिसरात खपवली जात होती.
पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून आकाशने अत्यंत चलाखीने रुग्णवाहिकेचा वापर करण्याची शक्कल लढवली होती. रुग्णवाहिकेला कोणत्याही चेकपोस्टवर अडवले जात नाही, याचाच फायदा या टोळीने उचलला. गेल्या वर्षभरात अशाच पद्धतीने ६ ते ७ वेळा गांजाची मोठी खेप महाराष्ट्रात आणली गेल्याची कबुली तपासात समोर आली आहे.
छत्तीसगडच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स आणि कोमाखान पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत आतापर्यंत एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये गांजाची घाऊक विक्री करणारे, वाहतूक करणारे आणि किरकोळ पुरवठा करणारे अशा साखळीचा समावेश आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आकाश जाधव हा केवळ सहभागी नव्हता, तर तो या व्यवसायाचे नियोजन करणारा ‘मास्टरमाईंड’ होता.
तो स्वतःच्या ‘क्लीन इमेज’चा वापर करून पोलिसांना चकवा देत असे. सर्पमित्र म्हणून लोकांचा त्याच्यावर मोठा विश्वास होता, मात्र याच विश्वासाच्या आडोशाने तो नशेच्या व्यापारात तरुणाईला ओढण्याचे काम करत होता की काय, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच शेवगाव तालुक्यातील प्रसिद्ध रीलस्टार कोमल काळे ही चोरीच्या गुन्ह्यात पकडली गेली होती. ती घटना ताजी असतानाच आता आकाश जाधवसारख्या मोठ्या नावाचा समावेश गांजा तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात समोर आल्याने, ‘रीलस्टार’ आणि गुन्हेगारी यांचे नाते घट्ट होत चालले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि चैनीचे आयुष्य जगण्यासाठी हे तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालले आहेत. सोशल मीडियावरील ही प्रसिद्धी आभासी असून, त्यामागे एक भयावह वास्तव दडलेले असू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या आकाश जाधव छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात असून, या रॅकेटमध्ये आणखी किती बडे मासे अडकले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही खेप पुण्यात कोणाकडे पोहोचवली जाणार होती आणि या व्यवसायातील आर्थिक व्यवहार कसे चालत होते, यावर पोलीस आता लक्ष केंद्रित करत आहेत. या अटकेनंतर महाराष्ट्रातील सर्पमित्र संघटनांमध्येही नाराजी पसरली असून, एका व्यक्तीच्या कृत्यामुळे संपूर्ण सर्पमित्र समाजाच्या प्रतिमेला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे. एकूणच, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा रीलस्टार आता तुरुंगाच्या गजाआड पोहोचला असून, तरुणाईने अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


