सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच महाराष्ट्रातील एका नेत्याचं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं निधन झालं आहे. महेश कोठे हे ५५ वर्षांचे होते. महेश कोठेंचा मृतदेह प्रयागराज येथून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महेश कोठे हे विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव होते. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

सोलापूरमधील काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याकरिता कोठे परिवाराची भूमिका अत्यंत महत्वाची होती. कालानंतराने महेश कोठेंनी काँग्रेस पक्षातून शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा प्रवास केला होता. महेश कोठे यांच्या अकाली निधनाने सोलापूर मधील राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी पक्षातुन निवडणूक लढवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here