मागच्या काही दिवसांपासून राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. शुक्रवारी विधीमंडळात देखील हा मुद्दा चांगलाच गाजला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती. बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.

नवनीत कावत यांची बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांसह स्थानिक लोकांकडून केली जातेय.

स्थानिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासात कुचराई केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर बारगळ यांची शुक्रवारी बदली करण्यात आली.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल झाल्यानंतर पवारांचा ताफा मस्साजोगला गेला. यावेळी देशमुख कुटुंबाचे सांत्वन करत शरद पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार नीलेश लंके, माजी मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here