
वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केल आहे. अमित शाह यांनी फक्त 25 दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल खासदार प्रियंका गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी अमित शाह यांचे आभार मानले आहेत. गृह मंत्रालयाने वायनाड येथील दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी गृह मंत्रालयाचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांच्या पुनर्वसनास मोठी मदत होईल असे प्रियंका गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमित शाह यांनी अखेर वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्तीचा दर्जा दिला याचा मला आनंद आहे. पुनर्वसनाची गरज असलेल्यांना मदत होईल आणि निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल मानले जाईल. या कामासाठी वेळेत पैसे दिल्यास आम्ही खूप आभारी राहू असे प्रियंका गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रियंका गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. या भेटी दरम्यान प्रियंका गांधी यांनी गृहमंत्र्यांना आपत्तीग्रस्त लोकांना त्वरित मदत देण्याची आणि परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्याची विनंती केली. प्रियंका गांधी यांनी अमित शाह यांना आपत्तीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मोठा परिसर बाधित झाला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे.



