
वर्षाअखेरीस झालेल्या अवकाळी पावसानंतर नव्या वर्षाचं स्वागत गुलाबी थंडीनं होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांच्या किमान तापमानात घट होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तपमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तपमान 2 ते 4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तपमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तपमानात येत्या 24 तासांत 4 ते 5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. तर, येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील किमान तपमानात पुन्हा घट होणार आहे. परंतु, राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तपमानाचा पारा कमी होत असला तरी मुंबईमध्ये मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण मुंबईतील तपमानाची नोंद 34 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे.


