
गुंतवणुकीवर झटपट पैसे मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. बऱ्याचदा शेअरमार्केटमध्ये आणि निफ्टीत पैसे गुंतवले जातात. (Torres scam Mumbai News) अशातच रविवारी पैसे गुंतवून शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न मिळवा अशी ऑफर देणाऱ्या टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने हजारो मुंबईकरांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेस गुंतवणूक कंपनी असं या कंपनीचं नाव आहे. नवी मुंबईसह, दादर, सानपडा , मीरारोड कांदिवली कल्याण, ग्रँट रोड परिसराता अशा एकूण सहा शाखा या कंपनीच्या आहे. पैसे जमा झाल्यानंतर एकाच वेळी सर्व शाखांना टाळे ठोकून कंपनीचा मालक फरार झाला असल्याची गुंतवणूकदारांनी दिली आहे.
या कंपनीने ३ टक्के ते ११ टक्के असा परतावा मिळेल असं आमिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितलं. लोकांनी याच लालचेपोटी १० हजार ते १० लाख अशी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणी टोरेस कंपनीशी संबंधित पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे.
हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा सुरु होती. टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते. गेल्यावर्षी या कंपनीने मुंबईत पहिले कार्यालय सुरु केले होते. त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती. अवघ्या सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळत असल्यामुळे अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते. मात्र, आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
टोरेस कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते. मात्र, हे दागिने बनावट होते. याविषयी अनेक गुंतवणुकदारांना माहिती होती. मात्र, आपल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळत असल्याने बहुतांश गुंतवणुकदारांनी याकडे कानाडोळा केला. टोरेस कंपनीत गुंतवणुकदारांना अवघ्या ४००० रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती.
ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी ६ टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना ११ टक्के व्याज मिळत होते. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा देऊन गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले होते.
हे वाचलं का? – धक्कादायक! राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षणानं संपवलं जीवन, खिशात सापडली चिठ्ठी, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरापासून ही कंपनी मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हप्ते मिळत होते. पण गेल्या दोन आठवड्यांपासून हप्ते मिळत नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
आम्हाला तुमचं व्याज नको. पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. कंपनीमध्ये नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कंपनीचा मालक परदेशात वास्तव्याला असल्याचं सांगण्यात येत आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


