
वैजापूर । दिपक बरकसे
पेट्रोल पंप चालू करण्यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करणाऱ्या उपसरपंच व दोघा ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागुल (उपसरपंच), मोबीन व सादिक (ग्रा.सदस्य) तिघे रा.खंडाळा अशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घटनेतील फिर्यादी यांचे भागीदार यांना उप महाप्रबंधक हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. विभागीय कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांनी खंडाळा येथे यांना पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. दरम्यान पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी खंडाळा ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते.
त्यासाठी तक्रारदार यांनी खंडाळा येथील ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु वेळोवेळी पाठपुरावा करून ग्रामविकास अधिकारी त्यांना प्रतिसाद देत नव्हते. या मुळे नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी खंडाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बागुल यांची २२ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. भेटी दरम्यान ‘तुम्हाला नाहरकत प्रमाणपत्र हवे असल्यास तीन लाख रुपये द्यावे लागतील. सर्व सदस्यांची मिटिंग घेऊनच आम्ही नाहरकत प्रमाणपत्र देत असतो त्यासाठी आम्हाला सर्व सदस्यांना पैसे द्यावे लागतात’ असे सांगितले.
हे वाचलं का? – गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचे दर कडाडणार?
पैसे दिल्याशिवाय काम होणार याची खात्री झाल्यावर तक्रारदार यांनि पैसे देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दिली,यानंतर २६ नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी व्हाईस रेकॉर्डर देऊन सोबत रात्री साडे सात वाजेच्या सुमारास खंडाळा येथे उपसरपंच बागुल यांच्या भेटीला पाठवले. तक्रारदार हे ‘उपसरपंच बागुल, ग्रामपंचायत सदस्य मोबीन व सादिक हे त्याठिकाणी होते. त्यांनी तडजोडी अंती अडीच लाखांची मागणी केली व काम झाल्यावर आम्ही तुम्हाला फोन करतो पैसे तयार ठेवा’ असे सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.
सोबत दिलेल्या व्हाईस रेकॉर्डर ची पथकाने तपासणी केली.मात्र यानंतर ‘त्या’ तिघांना तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांना पुन्हा फोन केला नाही.यानंतर तक्रारदार यांनी वारंवार फोन केले मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने आता उपसरपंच व अन्य दोखे सदस्य लाच स्वीकारणार नाही याची खात्री झाल्यावर या प्रकरणात मंगळवारी वैजापूर पोलिसांत तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



