
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीची समिती स्थापन केली आहे.
या समितीत १० पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळण्याची शक्यता आहे. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत. सध्याचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हेही तपास पथकात असणार आहेत.
हे वाचलं का? – जळगावात ‘थर्टी फस्ट’च्या रात्री राडा! पालधी गावात दगडफेक आणि जाळपोळ… नेमकं काय घडलं?
एसआयटीमध्ये कोण कोण? वाचा संपूर्ण यादी
- आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक
- अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक
- विजयसिंग शिवलाल जोनवाल, स. पो. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
- महेश विघ्ने, पो. उ. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
- आनंद शंकर शिंदे, पो. उ. निरीक्षक, केज
- तुळशीराम जगताप, सहा. पो. उ.निरीक्षक
- मनोज राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार
- चंद्रकांत एस. काळकुटे, पोलीस नाईक
- बाळासाहेब देविदास अहंकारे, पोलीस नाईक
- संतोष भगवानराव गित्ते, पोलीस शिपाई
दरम्यान, खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यावरनंतरही तब्बल दोन आठवडे फरार असलेला वाल्मिक कराड मंगळवारी दुपारी चित्रपटाच्या कथेला शोभावे, अशा पद्धतीने पोलिसांना शरण आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात येण्याआधी वाल्मिकने ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करून आपल्यावरील आरोप फेटाळले. राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हे दाखल झाल्याचे सांगत हत्या प्रकरणात माझ्यावर होत असलेले आरोप खोटे असून पोलिसांच्या तपासात जर गुन्हा सिद्ध झाला तर न्यायदेवतेची शिक्षा मी मान्य करेन, असे तो म्हणाला.
हे वाचलं का? – धक्कादायक! पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
शरणागतीची ध्वनिचित्रफित प्रसिद्ध करून पुढच्या काही मिनिटांत पुण्यातील पाषाण रस्त्यालगत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्य कार्यालयात तो स्वत:च्या गाडीतून आला हे विशेष. अधिकाऱ्यांनी त्याची जुजबी चौकशी करून त्याला केजच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. बुधवारी त्याची सीआयडीच्या विशेष अधिकाऱ्यांनी चौकशी केली.


