राजकीय पटलावर निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात, मात्र वैजापूर तालुक्यातील वाकला जिल्हा परिषद गटात यंदाचे चित्र काहीसे वेगळे आणि कमालीचे गुंतागुंतीचे पाहायला मिळत आहे. या गटात सध्या प्रचाराचा धुराळा उडाला असून चौरंगी लढतीचे रणशिंग फुंकले गेले आहे.

मात्र, या निवडणुकीत केवळ पक्षीय झेंडे आणि अजेंडे महत्त्वाचे ठरत नसून, त्यापेक्षाही कौटुंबिक नातेसंबंधांचा मोठा अडसर उमेदवारांसमोर उभा राहिला आहे. राजकीय गणितांपेक्षा रक्ताच्या नात्यांना आणि पाहुण्या-रावळ्यांना जपताना कार्यकर्त्यांची आणि मतदारांची जी कसरत होत आहे, ती सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

वाकला गटाच्या या रणांगणात भाजपकडून शिवकन्या मधुकर पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अश्विनी कैलास पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नीता दत्तात्रय त्रिभुवन आणि अपक्ष म्हणून नशीब आजमावत असलेल्या पार्वतीबाई रामहरी जाधव यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

चारही उमेदवार आपापल्या परीने ताकदवान असल्याने ही लढत अटीतटीची होणार यात शंका नाही. परंतु, उमेदवारी जाहीर झाल्यापासून या गटात ‘राजकारण’ कमी आणि ‘नातेसंबंधांची जपवणूक’ अधिक होताना दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांसमोर ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे पक्षाचा आदेश आणि निष्ठेचे बंधन आहे, तर दुसरीकडे समोरचा उमेदवार हा जवळचा नातेवाईक किंवा व्याही-पाहुणा आहे. अशा परिस्थितीत उघडपणे कोणाचे काम करायचे आणि कोणाला विरोध करायचा, या कात्रीत निष्ठावान कार्यकर्ते अडकले आहेत. अनेक वर्षांपासून पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.

गावातील बैठकांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी एका उमेदवाराला शब्द दिला असला, तरी घरी आलेल्या पाहुण्या उमेदवाराला ‘नाही’ म्हणणे त्यांना जड जात आहे. यामुळेच वाकला गटात सध्या ‘उघडपणे एकाचा प्रचार आणि छुप्या पद्धतीने दुसऱ्याला मदत’ अशी दुहेरी रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. दिवसा एकाचा झेंडा हाती धरणारा कार्यकर्ता रात्री छुप्या भेटीगाठी घेऊन दुसऱ्याला बळ देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियावर दिसणारी विलक्षण शांतता. एरवी निवडणुकीच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामवर पोस्ट्सचा पाऊस पडतो, एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. मात्र, वाकला गटात कार्यकर्त्यांनी कमालीचा संयम पाळला आहे.

समोरचा उमेदवार नात्यातील असल्याने किंवा मित्रत्वाचे संबंध असल्याने उघडपणे स्टेटस ठेवणे किंवा पोस्ट टाकणे टाळले जात आहे. सोशल मीडियावरील ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना, अशी शंका आता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांचा हा अबोला मतदानाच्या दिवशी नेमका कोणत्या उमेदवाराच्या फायद्याचा ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान, या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट माजी आमदार कैलास पाटील यांच्या कन्या अश्विनी कैलास पाटील यांच्या भूमिकेमुळे आला आहे. अश्विनी पाटील यांनी अचानक अपक्ष उमेदवार पार्वतीबाई रामहरी जाधव यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, कैलास पाटील आबांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या जुन्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

आबांच्या समर्थकांनी हा पाठिंबा नाकारत थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार नीता दत्तात्रय त्रिभुवन यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. समर्थकांच्या या भूमिकेमुळे अपक्ष उमेदवार रामहरी जाधव यांच्या गणितात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कौटुंबिक नाती, गावकीचा अभिमान आणि पक्षाची विचारधारा अशा तिहेरी गुंत्यात वाकला गट सध्या गुरफटला आहे. प्रचाराच्या मैदानात दिसणारी गर्दी आणि प्रत्यक्षात होणारे मतदान यामध्ये मोठी तफावत राहण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात होणारे आर्थिक आणि राजकीय फेरबदल कोणाचे नशीब उघडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मतदारांचा कल सध्या तरी गुलदस्त्यात असून, या चौरंगी लढतीत जो उमेदवार नातेसंबंधांचा गुंता सोडवून मतदारांच्या घराघरात पोहोचेल, तोच विजयाचा गुलाल उधळेल. वाकला गटातील हा पेचप्रसंग आता निकालाच्या दिवशीच सुटणार आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here