
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील ऐतिहासिक काशीविश्वेश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण आणि पुरातन तलाव पोखरण्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शवत शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. मंदिराच्या मालकीच्या जागेवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काशीविश्वेश्वर मंदिर हे शेकडो वर्षांपासून खंडाळा गावाचे श्रद्धास्थान आहे. मंदिर आणि त्याच्या परिसरातील तलावाची अधिकृत नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये आहे. तरीही, काही व्यक्ती मंदिराच्या जागेवर बेकायदा बांधकाम करत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. या अतिक्रमणामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व धोक्यात आले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात दरवर्षी भरणारी पारंपरिक यात्रा गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमणामुळे खंडित झाली आहे. ही यात्रा शेकडो वर्षांची परंपरा असून, गावकऱ्यांसाठी ती सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. अतिक्रमणामुळे या परंपरेला खीळ बसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मंदिराच्या जागेवर सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. यासोबतच, अतिक्रमण हटवून मंदिर परिसराचे संरक्षण करण्याची विनंतीही त्यांनी केली. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर ५०० हून अधिक भाविकांसह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


