
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर शहरात किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले असून, दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीने इंदिरानगर परिसर हादरला आहे. जुन्या वादातून आणि मोटारसायकलच्या कट मारण्याच्या कारणावरून एका कुटुंबावर जमावाने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत घरातील साहित्याची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, एका तरुणीची छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
फिर्यादी बबन अशोक शिंदे (वय ३५, रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी वैजापूरमधील रमाई चौकात अझहर अहमद शेख याने मोटारसायकलने फिर्यादीचा मुलगा आकाश याला कट मारला होता. हा वाद तेव्हा मिटला होता, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास याचे गंभीर पडसाद उमटले. बबन शिंदे यांचा मुलगा आकाश आणि पुतण्या मोक्ष गावात गेले असताना, जुन्या वादाचा राग मनात धरून ८ ते १० जणांच्या जमावाने त्यांचा पाठलाग केला.
हा जमाव हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगड घेऊन बबन शिंदे यांच्या घरापर्यंत पोहोचला. काहीही विचारण्यापूर्वीच अरबाज शकील सय्यद याने बबन शिंदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात शिंदे यांचे डोके फुटून ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर जमावातील इतर सदस्यांनी त्यांना लाकडी दांडक्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण केली.
हल्ला एवढ्यावरच थांबला नाही, तर शिंदे यांची पत्नी आणि मुले त्यांना वाचवण्यासाठी आली असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. यावेळी जमावातील अरबाज सय्यद आणि अझहर शेख यांनी शिंदे यांच्या पुतणीचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींनी ‘तुम्ही येथे राहायचे नाही’ अशी धमकी देत शिंदे यांच्या घरात घुसून घरगुती साहित्याची नासधूस केली. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या बुलेट मोटारसायकलचीही तोडफोड करून मोठे आर्थिक नुकसान केले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाल्याने हल्लेखोर तेथून पळून गेले. जखमी बबन शिंदे यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी अरबाज शकील सय्यद, अबरार शकील सय्यद, मोईन शकील सय्यद, इकबाल जाफर सय्यद, अर्शद इकबाल सय्यद, अशपाक हनीफ सय्यद, अझहर अहमद शेख, जहीर अहमद शेख आणि इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


